दौंड, सहजपूरच्या तरुणाची थेट उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी; उमेश म्हेत्रेच्या अर्जाने राजकीय वर्तुळात खळबळ

धनंजय काळे
पुणे (ता. दौंड) : देशाच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजप आघाडीने विद्यमान महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना, तर विरोधी INDIA ब्लॉकने बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पण या दोन दिग्गज उमेदवारांच्या शर्यतीत आता एका तरुणाने थेट अर्ज दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
दौंड तालुक्यातील सहजपूर गावचा उमेश म्हेत्रे (Umesh Mhetre) या तरुणाने उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दिल्लीतील राज्यसभा सचिवालयात निवडणूक निर्णय अधिकारी पी. सी. मोदी आणि गरिमा जैन यांच्याकडे त्यांनी आपला अर्ज सादर केला. यासाठी आवश्यक असलेले 15,000 रुपयांचे डिपॉझिट देखील त्यांनी जमा केले.
साधारण शेतकरी कुटुंबातून आलेल्या उमेश म्हेत्रे यांच्या या पावलामुळे स्थानिक पातळीवर आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भारतीय संविधानानुसार उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराचे वय किमान 35 वर्ष असणे आवश्यक आहे, तसेच 20 प्रस्तावक आणि 20 अनुमोदकांचा पाठिंबा मिळणे बंधनकारक आहे. म्हेत्रे यांनी या सर्व अटी पूर्ण केल्याचा दावा केला आहे.
या अर्जामुळे दोन राष्ट्रीय आघाड्यांच्या उमेदवारांसोबत एक सर्वसामान्य तरुणही निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. लोकशाहीवरील विश्वास आणि तरुणाईतील आत्मविश्वासाचे प्रतीक म्हणून म्हेत्रे यांच्या उमेदवारीकडे पाहिले जात आहे.
निवडणूक आयोग लवकरच या अर्जाची छाननी करणार असून, तो वैध ठरल्यास उमेश म्हेत्रे 9 सप्टेंबर 2025 रोजी होणाऱ्या निवडणुकीत थेट स्पर्धेत उतरतील.
सध्या म्हेत्रे यांचे नाव सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले असून, मोठ्या आघाड्यांच्या उमेदवारांसोबत एका ग्रामीण तरुणाची एंट्री उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला वेगळं वळण देणारी ठरणार आहे का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Editer sunil thorat





