डिझाईन सिंक परिषदेत अधिष्ठात्यांचा विद्यार्थ्यांना संदेश : “मानवी स्पर्शाशिवाय एआय अपूर्ण, विधायक वापराने अनेक संकटांना मिळू शकतो तोडगा” ; एआय संकट नव्हे, संधी! – डॉ. नचिकेत ठाकूर

पुणे : “आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) संकट नसून, योग्य वापर केल्यास ही मोठी संधी आहे. एआयमुळे अनेक कामे जलद गतीने होऊ शकतात आणि मानवासमोरील अनेक आव्हानांना तोडगा निघू शकतो. मात्र, एआय कितीही प्रगत झाले तरी त्याला मानवी स्पर्शाची सदैव गरज राहणार आहे,” असे मत एमआयटी एडीटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनचे अधिष्ठाता डॉ. नचिकेत ठाकूर यांनी व्यक्त केले.
ते डिझाईन सिंक या एकदिवसीय परिषदेत बोलत होते. या परिषदेसाठी गुगलच्या यु-एक्स संशोधक केतकी आगाशे, ट्युरिंग लॅब्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज कोठारी, लँडोरचे डिझायनर आर्यन शर्मा, तसेच सिमरन चोप्रा उपस्थित होते.
डॉ. ठाकूर पुढे म्हणाले की, “एमआयटी एडीटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन ही देशातील अग्रगण्य संस्था असून, यंदाच्या एनआयआरएफ क्रमवारीत डिझाईन गटात १५०-२०० क्रमांक मिळाला आहे. तसेच क्यूएस क्रमवारीतही संस्थेने आपली छाप पाडली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सातत्याने विविध उपक्रम राबवतो. ‘मेराकी’, ‘कारी’ यांसारख्या राज्यस्तरीय कला महोत्सवांपासून ते एआय व डिझाईनच्या समन्वयावर चर्चा करणाऱ्या परिषदांपर्यंत आमचे प्रयत्न असतात.’’
ट्युरिंग लॅब्सचे मनोज कोठारी म्हणाले की, “आज प्रत्येक क्षेत्रात डिझाईनची गरज भासते. आमची कंपनी यु-एक्स व तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत असून एमआयटी एडीटी विद्यापीठासोबत सामंजस्य करारही आहे. डिझाईन ही कल्पकतेतून जन्माला येते. त्यामुळे जोपर्यंत डिझायनर सर्जनशील आहे, तोपर्यंत त्याच्या कलेला मरण नाही.”
यावेळी केतकी आगाशे, आर्यन शर्मा आणि सिमरन चोप्रा यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपले अनुभव मांडले.
Editer sunil thorat





