शेतकऱ्यांना दिलासा; पीकविमा भरपाई सोमवारी थेट खात्यात जमा होणार…

पुणे : राज्यातील हजारो शेतकऱ्यांना खरिप २०२२ पासून रब्बी २०२४-२५ पर्यंतच्या वेगवेगळ्या हंगामातील थकीत पीकविमा भरपाई सोमवारी थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याणमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या पुढाकाराने ११ ऑगस्ट रोजी राजस्थानातील झुंझुनू येथे यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमास राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा उपस्थित राहणार आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून विमा कंपन्यांकडून भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. खरिप २०२२ पासूनची, तसेच खरिप २०२४ मधील काढणीनंतर व पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नव्हती. राज्य व केंद्र सरकारने आपापला विमा हप्ता आणि अनुदान भरूनही कंपन्यांनी रक्कम वितरित केली नव्हती.
राज्याचा हिस्स्याचा हप्ता जुलैमध्ये भरल्यानंतरही विलंब होत असल्याने केंद्र सरकारने थेट हस्तक्षेप केला. विमा कंपन्यांना दावे मंजूर करणे, रक्कम डिजिटल स्वाक्षरीसह तयार ठेवणे आणि सोमवारी एका क्लिकवर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्य सरकारांनाही भरपाई प्रक्रियेत अडथळा येणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे अनेक महिने भरपाईची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळणार आहे.
Editer sunil thorat




