
कदमवाकवस्ती (ता. हवेली) : संतश्रेष्ठ जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखी तळ, कदमवाकवस्ती येथील पवित्र आणि ऐतिहासिक स्थळी एका विशिष्ट समाजातील नागरिकांनी खुलेआम अतिक्रमण करून वास्तव्य केल्याचा गंभीर आरोप शिवसेना (शिंदे गट) पुणे जिल्हा संघटक निलेश काळभोर यांनी केला आहे. या प्रकरणी तात्काळ चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
गेल्या एक महिन्यापासून पालखी तळ परिसरात संशयास्पद हालचाली सुरू असूनही प्रशासनाने कोणतीही ठोस दखल घेतलेली नाही, असा आरोप करत काळभोर यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “पालखी तळासारख्या धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळी बेकायदेशीर वास्तव्यास परवानगी कशी दिली गेली? हे नागरिक नेमके कोठून आले, त्यांच्या जवळ वैध ओळखपत्रे आहेत का, त्यांची पार्श्वभूमी काय आहे, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. अन्यथा भविष्यात स्थानिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होऊ शकतो,” असा इशाराही त्यांनी दिला.
यासोबतच, या लोकांना आश्रय कोणी दिला, कोणाच्या परवानगीने अतिक्रमण झाले, याचीही चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. “प्रशासनाला नागरिकांच्या सुरक्षेशी काही देणेघेणे आहे की नाही? एखादी गंभीर घटना घडल्यानंतरच जाग येणार का?” असा थेट सवालही निलेश काळभोर यांनी उपस्थित केला. दरम्यान, परिसरातील महिलावर्ग व ज्येष्ठ नागरिकांमध्ये वाढत्या गर्दीमुळे अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा आहे. मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. अतिक्रमण त्वरित हटवले नाही, तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या संदर्भात कदमवाकवस्ती ग्रामसेवक श्रीकांत वाव्हळ यांनी सांगितले की, “या प्रकरणाची पूर्वकल्पना नव्हती. ग्रामपंचायत कर्मचारी पाठवून संबंधितांना हटवण्याची कार्यवाही करण्यात येईल.” असे यावेळी सांगण्यात आले.
तसेच अपर तहसीलदार तृप्ती कोलते (लोणी काळभोर तहसील कार्यालय) यांनी सांगितले की, पालखी तळाच्या जागेची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. “अतिक्रमणाबाबत अद्याप अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही. मात्र तातडीने माहिती घेऊन चौकशी केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थितीत होत आहे.
Editer sunil thorat



