२२ व्या वर्षी UPSC क्रॅक; पोरगेलासा चेहरा, पण खांद्यावर कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी—युवा IPS अभिजीत पाटील चर्चेत…

मुंबई : युपीएससी नागरी सेवा परीक्षा ही देशातील सर्वांत कठीण आणि प्रतिष्ठेची परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो विद्यार्थी आयएएस, आयपीएस आणि इतर भारतीय सेवांमध्ये जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून ही परीक्षा देतात. मात्र त्यातील मोजकेच उमेदवार अंतिम यादीत स्थान मिळवतात. अशाच निवडक यशस्वी उमेदवारांमध्ये अभिजीत पाटील या तरुण अधिकाऱ्याचे नाव सध्या देशभरात चर्चेत आले आहे. अवघ्या २२ व्या वर्षी UPSC परीक्षा उत्तीर्ण करून IPS अधिकारी बनलेल्या अभिजीत पाटील यांनी आपल्या वयापेक्षा कितीतरी मोठी कामगिरी करून दाखवली आहे.
पोरगेलासा चेहरा, कोवळे व्यक्तिमत्त्व आणि IPS च्या वर्दीत पाहताच अनेकांना क्षणभर डोळ्यांवर विश्वास बसत नाही. पाहता क्षणी हा तरुण नुकताच कॉलेजमधून बाहेर पडलेला विद्यार्थी वाटतो. मात्र, हाच ‘जनरेशन Z’ मधील IPS अधिकारी आज भारतीय पोलीस सेवेतील महत्त्वाची जबाबदारी समर्थपणे सांभाळण्यासाठी सज्ज झाला आहे. अभिजीत पाटील हे राजस्थान कॅडरचे सर्वात कमी वयाचे IPS अधिकारी ठरले असून त्यांच्या खांद्यावर कायदा व सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
अभिजीत पाटील यांची यशोगाथा विशेष ठरण्याचे कारण म्हणजे त्यांनी कोणतेही कोचिंग किंवा क्लासेस न लावता UPSC परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली आहे. 2022 मध्ये झालेल्या नागरी सेवा परीक्षेत त्यांनी अखिल भारतीय स्तरावर 470 वी रँक मिळवली. अवघ्या २२ व्या वर्षी मिळवलेले हे यश अनेक अनुभवी स्पर्धकांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
अभिजीत पाटील यांचा जन्म 11 जून 1999 रोजी महाराष्ट्रातील ठाणे शहरात झाला. त्यांचे वडील तुलसीराम पाटील हे मुंबई महानगरपालिकेत चीफ ऑडिटर पदावर कार्यरत होते, तर आई आशा देवी या सिंचन खात्यात अधिकारी म्हणून सेवेत होत्या. दोघेही सध्या स्वेच्छानिवृत्त झाले आहेत. अभिजीत पाटील हे घरातील दोन बहिणींच्या पाठीवर झालेले एकुलते एक पुत्र असून कुटुंबाने दिलेला शिस्तप्रिय संस्कार आणि शिक्षणासाठी मिळालेला पाठिंबा त्यांच्या यशामागील महत्त्वाचा आधार ठरला आहे.
युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर अभिजीत पाटील यांना राजस्थान कॅडरचा IPS सर्व्हिस कॅडर मिळाला. अवघ्या 23 व्या वर्षी IPS कॅडरचे वाटप झाल्याने ते भारताच्या चौथे–पाचवे सर्वात तरुण IPS अधिकारी म्हणून ओळखले जातात. 2023 बॅचचे IPS अधिकारी असलेले अभिजीत पाटील हे सध्या, 2026 मध्ये, 26 वर्षांचे आहेत.
याआधी गुजरात कॅडरचे IPS अधिकारी सफीन हसन यांनी 2018 मध्ये अवघ्या 22 व्या वर्षी UPSC परीक्षा उत्तीर्ण करत सर्वात कमी वयाचे IPS अधिकारी होण्याचा मान मिळवला होता. त्या तुलनेत अभिजीत पाटील हे देखील देशातील सर्वात तरुण IPS अधिकाऱ्यांच्या यादीत आपले स्थान निश्चित करण्यात यशस्वी ठरले आहेत.
अतिशय कमी वयात मिळालेली ही जबाबदारी केवळ पदापुरती मर्यादित नसून समाजातील शांतता, सुरक्षा आणि कायद्याची अंमलबजावणी यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अभिजीत पाटील यांचा प्रवास हे सिद्ध करतो की कठोर परिश्रम, सातत्य आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणतेही स्वप्न साकार करता येते. आजचा हा युवा IPS अधिकारी देशातील लाखो स्पर्धा परीक्षार्थींना नवी दिशा आणि प्रेरणा देत आहे.
Editer sunil thorat



