पहिली पत्नी जिवंत असताना दुसरे लग्न, सोशल मीडियावर ‘पत्नी’ म्हणून प्रचार ; पतीसह १० जणांवर गुन्हा दाखल…

लोणी काळभोर (ता. हवेली, जि. पुणे) : पहिल्या पत्नीशी वैवाहिक नाते कायदेशीररित्या अस्तित्वात असतानाही पतीने जाणीवपूर्वक व हेतुपुरस्सर दुसऱ्या महिलेशी दुसरे लग्न करून सहजीवन सुरू केल्याचा तसेच सोशल मीडिया व निवडणूक प्रचाराच्या माध्यमातून दुसऱ्या महिलेला पत्नी म्हणून सादर करून पहिल्या पत्नीचा मानसिक छळ व बदनामी केल्याचा गंभीर प्रकार लोणी काळभोर येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी पिडीत पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह एकूण दहा जणांविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, संबंधित दुसरी महिला जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एका राष्ट्रीय पक्षाकडून उमेदवार असून प्रचारादरम्यान स्वतःला पिडीत महिलेच्या पतीची पत्नी म्हणून सादर करीत असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ कौटुंबिक वादापुरता मर्यादित न राहता सामाजिक व राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे.
कोणावर गुन्हा दाखल?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून सिद्धेश्वर नामदेव काळभोर (पती), पुनम बाबुराव गायकवाड (दुसरी पत्नी), नवनाथ नामदेव काळभोर (दीर), स्नेहल नवनाथ काळभोर (जाऊ) सर्व रा. लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे, तसेच पतीचे नातेवाईक निमला चौधरी (मावशी) रा. लोहगाव, पुणे, नंदा उत्तम बोत्रे, उत्तम बोत्रे, दत्तात्रय रंगनाथ भाडळे, ऋषाली निलेश बोत्रे व प्रणाली स्वप्नील बोत्रे (सर्व रा. सालुमाळू परगाव, ता. दौंड, जि. पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अश्लील मेसेज व विनयभंगाचा आरोप…
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, सन २०१९ पासून पती सिद्धेश्वर काळभोर हे पुनम गायकवाड हिच्यासोबत राहत आहेत. २३ जून २०२० रोजी व त्यानंतरच्या काळात पुनम गायकवाड हिने पिडीत महिलेच्या मोबाईलवर अश्लील भाषेत व्हॉट्सअॅप व टेक्स्ट मेसेज पाठवून विनयभंग केला. या कृत्याला पतीचा सक्रिय पाठिंबा असल्याचेही पिडीत महिलेने फिर्यादीत नमूद केले आहे.
सोशल मीडियावर बदनामी, फ्लेक्स व स्टेटसद्वारे प्रचार…
पती व नातेवाईकांना पिडीत महिलेच्या वैध विवाहाची पूर्ण माहिती असतानाही पुनम गायकवाड हिच्यासोबतचे फोटो काढून सोशल मीडियावर ‘पत्नी’ म्हणून पोस्ट, स्टेटस व फोटो अपलोड करण्यात आले. अनेक ठिकाणी फ्लेक्स लावून त्यास पाठिंबा देण्यात आल्याने पिडीत महिलेची समाजात बदनामी झाल्याचा आरोप आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गावात घरोघरी जाऊन पुनम गायकवाड हिला पिडीत महिलेच्या पतीची पत्नी म्हणून सादर करण्यात आले. तसेच व्हॉट्सअॅप स्टेटस व फेसबुक पोस्टद्वारेही तसाच प्रचार करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
मुलांवरही गंभीर मानसिक परिणाम…
पिडीत महिलेची दोन मुले मोबाईलवर हे व्हॉट्सअॅप स्टेटस व सोशल मीडिया पोस्ट पाहत असल्याने त्यांच्यावरही गंभीर मानसिक परिणाम होत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या सर्व प्रकारामुळे पिडीत महिला व तिच्या मुलांना मानसिक छळ सहन करावा लागत असल्याचा आरोप आहे.
आर्थिक फसवणूक व नोकरी घालवण्याचा कट…
पिडीता नोकरीस असून तिने पती व नातेवाईकांना मोठी आर्थिक रक्कम तसेच दागिने दिले होते. मात्र पतीने कोणतेही पैसे किंवा दागिने परत न करता उलट पुनम गायकवाड हिच्यासोबत मिळून तिची नोकरी जावी यासाठी कट रचल्याचा आरोप आहे. यासाठी तिच्याविरोधात वारंवार तक्रारी अर्ज दाखल करण्यात आल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
आत्महत्येची धमकी…
या प्रकरणी पिडीत महिलेने भरोसा सेल, पुणे शहर येथे तक्रार दिल्यानंतर चौकशीदरम्यान पतीने “आत्महत्या करेन” अशी धमकी दिल्याने भावनिक दबावाखाली तिने त्या वेळी अर्ज दफ्तरी फाईल केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
निवडणूक उमेदवारीसाठी दबाव व धमकी…
डिसेंबर २०१५ मध्ये पुनम गायकवाड हिला जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पत्नी या नात्याने उमेदवार म्हणून उभे करण्याच्या उद्देशाने पिडीत महिलेने कोणताही विरोध करू नये, यासाठी दिर नवनाथ काळभोर याने फोन करून धमकी दिल्याचा आरोप आहे. “तिकीट मिळणार आहे, विरोध केलास तर मी माझ्या भावासाठी जेलमध्येही जायला तयार आहे,” असे वक्तव्य केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
पोलीस तपास सुरू…
या सर्व बाबींच्या आधारे पिडीत महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पतीसह दहा जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.
Editer sunil thorat



