थेऊर फाट्यावर मोठी कारवाई, ५३ किलो गांजासह आरोपी जेरबंद ; ४० लाखांचा मुद्देमाल जप्त…

तुळशीराम घुसाळकर
लोणी काळभोर (ता. हवेली) : अंमली पदार्थ विरोधी पथक-१, गुन्हे शाखा पुणे शहर आणि लोणी काळभोर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत गांजाचा मोठा साठा विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्या एका इसमास जेरबंद केले. या कारवाईत ५३ किलो १४ ग्रॅम गांजा, फॉर्च्युनर कार आणि मोबाईल असा एकूण ४० लाख ७० हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रितम रविंद्र कुंजीर (वय ३२, रा. धुमाळमळा, म्हसोबा मंदिराजवळ, थेऊर, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून १० लाख ६० हजार २८० रुपये किमतीचा ५३ किलो १४ ग्रॅम गांजा, ३० लाख रुपये किमतीची फॉर्च्युनर कार आणि १० हजार रुपये किमतीचा मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पुणे शहरातून अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार बुधवार (११ मार्च) रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण आणि त्यांचे पथक पुणे शहर हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी एका इसमाकडून पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्युनर गाडीतून थेऊर परिसरात मोठा गांजाचा साठा विक्रीसाठी आणला जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी मंगळवार रात्रीपासून थेऊर परिसरात सापळा रचला. पहाटे सुमारे पाचच्या सुमारास धुमाळ मळा, थेऊर फाटा येथे संशयित गाडी अडवून प्रितम कुंजीर याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता गांजाचा मोठा साठा आढळून आला.
प्राथमिक चौकशीत हा गांजा ‘कट्टीमनी’ व ‘अक्षय’ नावाच्या इसमांनी विक्रीसाठी दिल्याची कबुली कुंजीर याने दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथक-१, गुन्हे शाखा पुणे शहर येथील पोलीस हवालदार विजय शहाजी कांबळे यांनी फिर्याद दिली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजन शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उपआयुक्त निखील पिंगळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अंमली पदार्थ विरोधी पथक-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे तसेच गुन्हे शाखा व लोणी काळभोर पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.
Editer sunil thorat



