आरोग्यक्राईम न्युजसामाजिक

तरुणांना नशेच्या गर्तेत ढकलणारा ‘पान’ व्यवसाय उघड ; कदमवाकवस्तीतील मैफिलवर पोलिसांचा छापा…

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : कदमवाकवस्ती परिसरात खुलेआम सुरू असलेल्या नशेली पानाच्या व्यवसायावर पोलिसांनी मोठी कारवाई करत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. पुणे शहर पोलीस यांच्या अंमली विरोधी पथक क्र. २ ने शुक्रवारी (ता. १३) सायंकाळी पाचच्या सुमारास कदमवाकवस्ती येथील ‘मैफिल पान शॉप’वर अचानक छापा टाकत दोन जणांना अटक केली. या कारवाईत २६६.४ ग्रॅम अंमली पदार्थ मिश्रित पान, मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा सुमारे १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात दुकान मालक निशांत दत्तात्रय काळभोर (वय १९, रा. बाजारमळा, लोणी काळभोर) आणि कामगार रामजी संतोष पटेल (वय ३३, सध्या रा. कदमवाकवस्ती, मूळ रा. बांदा, उत्तर प्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणातील रोहित जवळकर (रा. लोणी काळभोर) हा आरोपी सध्या फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपींविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाणे येथे अंमली पदार्थ व सायकोट्रॉपिक पदार्थ कायद्यानुसार कलम ८(c), १७(b) आणि २२(b) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंमली विरोधी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आणि मोबाईल ड्रग टेस्टिंग मशीनच्या सहाय्याने तपास केला असता खाण्याच्या पानामध्ये अ‍ॅम्फेटामाइन, बेंझोडायझेपाइन्स, ओपिएट्स आणि मेथाम्फेटामाइन यांसारख्या धोकादायक अंमली पदार्थांचे मिश्रण करून नशेली पाने विकली जात असल्याचे उघड झाले. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

या कारवाईनंतर परिसरातील अनेक पान टपऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक पान विक्रेते, अवैध गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. पूर्व हवेली परिसरात बहुतेक ठिकाणी नशा देणारी पाने खुलेआम विकली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे ही दुकाने पुणे–सोलापूर महामार्ग परिसरात, चौकाचौकात तसेच हॉस्टेल, कॉलेज आणि शैक्षणिक संस्थांच्या आसपास बिनधास्त सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या नशेली पानाच्या आहारी जात असल्याची गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

या नशेली पानाची किंमत साधारण ३५ रुपये असून ते खाल्ल्यानंतर दारूच्या बाटली इतकी नशा होत असल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे या पानाला दारू किंवा गुटख्यासारखा वास नसल्यामुळे पालकांना मुलांनी नशा केल्याचे लगेच लक्षात येत नाही. त्यामुळे अनेक कुटुंबांमध्ये नकळत तरुण पिढी व्यसनाच्या दलदलीत अडकत असल्याचे चित्र समोर येत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्यसभा आणि विधानसभेतही नशेली पानाचा मुद्दा गाजला होता.

तरीही स्थानिक प्रशासन आणि हवेली अन्न व औषध प्रशासन विभागाने ठोस मोहीम राबवली नाही, नागरिकांनी तक्रारीसाठी फोन केले असता संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचे वारंवार नागरिकांना अनुभव येत आहेत. परिणामी आज हा व्यवसाय अनेक ठिकाणी वाढला असून तरुण पिढीला व्यसनाच्या गर्तेत ढकलणारा हा धोकादायक प्रकार प्रशासनाच्या नजरेआड कसा राहिला, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

या नशेली पानामुळे विद्यार्थ्यांमध्ये भांडणे, आरोग्याच्या समस्या आणि असामाजिक वर्तन वाढत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. त्यामुळे केवळ एका दुकानावर कारवाई करून हा प्रश्न सुटणार नाही, तर पूर्व हवेली परिसरातील सर्व नशेली पान विक्री केंद्रांवर व्यापक मोहीम राबवून कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

या संदर्भात पंडित रेजीतवाड (पोलीस निरीक्षक, अंमली विरोधी पथक क्र. २) यांनी सांगितले की, कदमवाकवस्तीतील ‘मैफिल पान शॉप’वर छापा टाकून दुकानातील अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. अशा प्रकारच्या अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असून येथून पुढेही ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??