
हवेली (पुणे) : एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (ADT) विद्यापीठ, लोणी-काळभोर आणि रायन इंटरनॅशनल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स यांच्यात शैक्षणिक सहकार्याचा महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या प्रा. एच. के. व्यास सभागृहात दोन्ही संस्थांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा करार औपचारिकरीत्या संपन्न झाला.
या कराराचा उद्देश शालेय आणि उच्च शिक्षण यांच्यात प्रभावी शैक्षणिक दुवा निर्माण करणे हा असून, डिझाईन थिंकिंग, नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षणाचा प्रारंभिक टप्प्यात समावेश करण्यावर भर देण्यात येणार आहे. या सहकार्याअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, शैक्षणिक भेटी तसेच एमआयटी एडीटी विद्यापीठातील मेकर्स्पेस आणि इनोव्हेशन लॅब्ससारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या कार्यक्रमास रायन समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद शर्मा, शैक्षणिक बाबींच्या उपाध्यक्षा निधी थापर तसेच उपाध्यक्ष व व्यवसाय प्रमुख जॉन अॅलेक्स उपस्थित होते. एमआयटी एडीटी विद्यापीठातर्फे प्र-कुलगुरू डॉ. नचिकेत ठाकूर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. दंडेश्वर बिसोयी, कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांच्यासह इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनचे प्राध्यापक उपस्थित होते.
रायन इंटरनॅशनल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स ही देशातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था असून, २० राज्ये आणि ४० शहरांमधील १५० हून अधिक शाळांद्वारे सुमारे २.५ लाख विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत व्यक्तिमत्त्व विकास, क्रीडा, कला आणि नेतृत्वगुणांच्या विकासावरही संस्थेचा भर असतो.
यावेळी बोलताना विनोद शर्मा म्हणाले की, “उत्कृष्ट शिक्षण हे केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. एमआयटी एडीटी विद्यापीठासोबतचे सहकार्य विद्यार्थ्यांना डिझाईन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यांचा प्रत्यक्ष अनुभव देणारे ठरेल.”
डॉ. नचिकेत ठाकूर यांनी सांगितले की, “डॉ. मंगेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या करारातून विद्यार्थ्यांना डिझाईन-आधारित समस्या निराकरण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा लवकर परिचय मिळणार आहे. बदलत्या जागतिक करिअर संधींसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल.”
कार्यक्रमाची सुरुवात विश्वशांती प्रार्थनेने झाली असून सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रन्शिल मल्होत्रा यांनी विशेष परिश्रम घेतले.
Editer sunil thorat



