महामार्गावरील हॉटेलमध्ये घाणेरडा खेळ ; पोलिसांच्या छाप्यात देहव्यापाराचा भांडाफोड…
रात्री पोलिसांची धडक एन्ट्री; ‘हॉटेल 96 कट्टा’वर छापा, पुणे–सोलापूर महामार्गावर देहव्यापाराचा पर्दाफाश...

इंदापूर / पुणे : सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार समोर आला असून इंदापूर तालुक्यातील गागरगाव हद्दीत सुरू असलेल्या बेकायदेशीर देहव्यापारावर पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे. ‘हॉटेल कल्याण अॅग्रो’ आणि ‘हॉटेल 96 कट्टा’ या ठिकाणी सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायावर छापा टाकत पोलिसांनी कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक विलास नाळे यांना गुप्त बातमीदारामार्फत या गैरप्रकाराची माहिती मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर ३ एप्रिल रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास इंदापूर पोलिसांनी सापळा रचत दोन्ही हॉटेलवर एकाच वेळी धाड टाकली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
छाप्यात पोलिसांच्या निदर्शनास आले की, काही महिला व तरुणींना जबरदस्तीने देहव्यापारात ढकलले जात होते. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत संबंधित महिलांची सुटका केली. तसेच घटनास्थळावरून रोख रक्कम आणि आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले. महिला पोलिसांनी तपासणी केली असता एका महिला एजंटकडून २,००० रुपये रोख सापडले असून एकूण ३,३७५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
या प्रकरणी पोलीस फौजदार शुभांगी खंडागळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हॉटेल मालक दीपक ज्ञानदेव सिताराम ढवळे तसेच संबंधित महिला एजंटविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
पुणे–सोलापूर महामार्ग हा अत्यंत वर्दळीचा आणि महत्त्वाचा मार्ग मानला जातो. अशा मुख्य रस्त्यालगत असलेल्या हॉटेलमध्ये बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याचे उघड झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे महामार्गावरील अशा गैरप्रकारांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Editer sunil thorat



