हवेली तालुक्याचा ऐतिहासिक शैक्षणिक गौरव : विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्र्यांशी फ्रेंच भाषेत थेट संवाद…

हवेली : हवेली तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्ता, आत्मविश्वास आणि आधुनिक शिक्षणपद्धतीच्या जोरावर राज्यपातळीवर ठसा उमटवत एक ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. खानवडी येथील ज्योती सावित्री आंतरराष्ट्रीय शाळेच्या भव्य उद्घाटन सोहळ्यात जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांनी थेट फ्रेंच भाषेत मान्यवरांशी संवाद साधत उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री Devendra Fadnavis, उपमुख्यमंत्री Sunetra Pawar, शालेय शिक्षण मंत्री Dada Bhuse, खासदार Supriya Sule तसेच पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे आणि विविध विभागातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या मान्यवरांसमोर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी फ्रेंच भाषेत सहज, स्पष्ट आणि आत्मविश्वासपूर्ण संवाद साधत सर्वांना आश्चर्यचकित केले.
हवेली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बांगर-हरगुडेवस्ती (केसनंद) येथील कु. काव्या अतुल हरगुडे आणि कु. समर्थ नवनाथ बहिरट तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पेठ येथील कु. वैष्णवी गणेश चौधरी आणि कु. सृष्टी अमोल मोरे या विद्यार्थ्यांनी फ्रेंच भाषेतील प्रभावी संभाषण सादर केले. त्यांनी स्वतःची ओळख, शिक्षणाविषयीचे विचार आणि विविध विषयांवर फ्रेंचमध्ये मांडणी करत उपस्थितांकडून दाद मिळवली. या विद्यार्थ्यांच्या सादरीकरणामुळे त्यांच्या शाळांचा तसेच हवेली तालुक्याचा शैक्षणिक दर्जा उंचावल्याचे स्पष्ट झाले.
ग्रामीण भागात राहूनही जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याचा यशस्वी प्रयोग या माध्यमातून अधोरेखित झाला आहे. या विद्यार्थ्यांना परकीय भाषा शिक्षणाचे प्रभावी प्रशिक्षण अमोल शाहुराव लाड आणि सचिन साकोळकर यांनी दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी केवळ भाषा शिकली नाही, तर आत्मविश्वासाने संवाद साधण्याची क्षमता विकसित केली. सातत्यपूर्ण सराव, आधुनिक अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांमधील जिज्ञासा यामुळे हा उल्लेखनीय परिणाम साध्य झाला आहे.
या उपक्रमाला शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय नाईकडे, गटविकास अधिकारी शेखर शेलार आणि गटशिक्षणाधिकारी हेमंतकुमार खाडे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रेरणेमुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात असून ग्रामीण विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी सक्षम बनवले जात आहे.
या यशस्वी संवादामुळे हवेली तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षण व्यवस्थेचा दर्जा राज्यभर अधोरेखित झाला असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये परकीय भाषा शिक्षणाबाबत नवचैतन्य निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांना भविष्यातील जागतिक संधींसाठी तयार करण्यात मोठी मदत होत आहे.
या ऐतिहासिक कामगिरीबद्दल सर्व विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक आणि ग्रामस्थ यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून हवेली तालुक्याच्या शैक्षणिक प्रगतीचा हा एक अभिमानास्पद टप्पा ठरत आहे.
Editer sunil thorat



