मंचरचे उपविभागीय अधिकारी दोन लाखांची लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात…
पुणे एसीबीची धडाकेबाज कारवाई; बांधकाम प्रकल्पासाठी मागितली होती लाच...

मंचर : जुन्नर-आंबेगाव विभागाचे उपविभागीय अधिकारी (प्रांत अधिकारी) Govind Pandharinath Shinde यांना दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना Anti Corruption Bureau Maharashtra पुणे पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून, प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे बांधकाम व्यवसायिक असून नारायणगाव परिसरात त्यांचा गृहप्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पातील एका इमारतीचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले होते. या इमारतीसाठी ‘अंशतः पूर्णत्व प्रमाणपत्र’ (Partial Completion Certificate) मिळवण्यासाठी त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. मात्र हा दाखला मंजूर करण्यासाठी शिंदे यांनी तब्बल पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले. तडजोडीअंती दोन लाख रुपये देण्याचे ठरले.
तक्रारदाराने याबाबत पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचण्याची योजना आखली. शुक्रवारी (दि. २७) दुपारी मंचर येथील शासकीय कार्यालयात सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने शिंदे यांना दोन लाख रुपयांची रक्कम दिली असता, ती स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने तात्काळ कारवाई करत त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले.
शिंदे हे वर्ग-१ दर्जाचे वरिष्ठ अधिकारी असून, त्यांच्या अटकेमुळे महसूल खात्यात खळबळ उडाली आहे. अशा प्रकारच्या कारवायांमुळे भ्रष्टाचाराविरोधात प्रशासनाचा कडक संदेश जात असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक Shirish Sardeshpande, अप्पर पोलीस अधीक्षक Ajit Patil यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक Prasad Lonare, प्रविण निंबाळकर व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
Editer sunil thorat



