
कदमवाकवस्ती (ता. हवेली) : सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिक व शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नसल्याने कदमवाकवस्ती परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत सदस्या राजेश्री उदय काळभोर यांनी जिल्हाधिकारी, पुणे यांना निवेदन देत प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच १३ एप्रिल २०२६ पासून अप्पर तहसील कार्यालय, लोणी काळभोर समोर बेमुदत आमरण उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे.
निवेदनानुसार, १४ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे कदमवाकवस्तीतील अनेक घरांमध्ये पाणी शिरून अन्नधान्य, कपडे, फर्निचर व इतर जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक कुटुंबांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते. या घटनेनंतर ग्रामपंचायतीकडून तत्काळ पंचनामे करून ते ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले होते.
मात्र, त्यानंतरच्या प्रशासकीय प्रक्रियेत मोठ्या त्रुटी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. अंतिम नुकसानग्रस्तांच्या यादीत अनेक पात्र नागरिकांची नावे वगळण्यात आली, तर काही पंचनामे जाणूनबुजून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवलेच गेले नाहीत, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. परिणामी, प्रत्यक्ष नुकसान सहन करूनही अनेक नागरिक व शेतकरी अद्याप मदतीपासून वंचित आहेत.
याबाबत संबंधित ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांच्या कामकाजाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सर्व पात्र लाभार्थ्यांची पुनर्तपासणी करून तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी ठाम भूमिका ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली आहे.
दरम्यान, प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास १३ एप्रिलपासून बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार असल्याने परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे. या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढणार असून स्थानिक नागरिकांचे लक्ष या प्रश्नाकडे लागले आहे.
या निवेदनाच्या प्रती राजेश्री उदय काळभोर यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार लोणी काळभोर तसेच पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर पोलीस ठाणे यांना देण्यात आल्या असून आता प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Editer sunil thorat



