
पुणे : शहरातील वाढत्या अवैध प्रकारांवर आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला बळकटी देण्यासाठी पुणे पोलीस दलाकडून परिमंडळ-१ कार्यक्षेत्रात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. दि. ११ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७.०० ते रात्री १०.०० या कालावधीत फरासखाना, समर्थ, खडक, विश्रामबाग, डेक्कन आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही व्यापक कारवाई करण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत सार्वजनिक ठिकाणे, मोकळी मैदाने, तसेच गुन्हेगारी दृष्ट्या संवेदनशील मानले जाणारे ‘ब्लॅक स्पॉट्स’ यांची सखोल तपासणी करण्यात आली. एकूण ४७ ठिकाणी पोलिसांनी अचानक धाड टाकत संशयित हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले. या तपासणीदरम्यान विविध कायद्यांअंतर्गत कारवायांचा धडाका लावण्यात आला.
भा.न्या.सं. कलम २८५ अन्वये २ गुन्हे नोंदवण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोटपा कायद्यांतर्गत १६ खटले दाखल करण्यात आले. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या ४४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
याशिवाय महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत १९ प्रकरणे नोंदवली गेली, तर मोटार वाहन कायद्यांतर्गत ४ गुन्ह्यांची नोंद झाली. महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत ८ गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच ३ संशयित आरोपींची तपासणी करून त्यांची पार्श्वभूमी पडताळण्यात आली.
ही संपूर्ण मोहीम पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार राबविण्यात आली.
पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा आणि अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या नेतृत्वात सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, प्रभारी अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी समन्वय साधत कारवाई पार पाडली.
पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे परिसरातील अवैध कृत्यांना आळा बसण्यास मदत होणार असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. भविष्यातही अशा स्वरूपाच्या तपासणी मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Editer sunil thorat





