
कदमवाकवस्ती (ता. हवेली) : दि. १८ हवेली तालुक्यातील आळंदी म्हातोबा, तरडे तसेच परिसरातील अनेक गावांसाठी जीवनवाहिनी मानला जाणारा कुंजीरवाडी येथील नव्या उजव्या कालव्यावरील पूल गेली अनेक वर्षे प्रत्यक्षात येण्याऐवजी केवळ कागदावरच असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. २०१४ साली ३३.५२ लाख रुपयांची मंजुरी मिळालेल्या या कामाचा खर्च आज तब्बल ८० लाखांवर पोहोचला असला, तरी प्रत्यक्षात काम सुरू झाले नाही.
या पुलासाठी आतापर्यंत तीन वेळा निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून सर्व प्रशासकीय मंजुरी मिळूनही काम रखडलेले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, या कामाचे कंत्राट बाहेरच्या तालुक्यातील ठेकेदाराला देण्यात आले असल्याची माहिती असून, संबंधित ठेकेदाराने अद्याप कामाला सुरुवात केलेली नाही.
प्रशासनाकडून “कालव्याचे पाणी थांबल्यानंतर जून महिन्यात काम सुरू केले जाईल” असे स्पष्टीकरण दिले जात असले, तरी नागरिकांना हे कारण मान्य नाही. कारण, ३३.५२ लाखांचा खर्च वाढून थेट ८० लाखांवर कसा गेला, याचे स्पष्ट उत्तर अद्याप मिळालेले नाही. खर्चवाढीमागील ठोस कारणे समोर न आल्याने गावागावात विविध चर्चांना उधाण आले आहे.
यामध्ये राजकीय हस्तक्षेप असल्याची कबुली काही अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिल्याने या प्रकरणावर अधिकच संशयाचे सावट निर्माण झाले आहे. “पाणी थांबण्याची वाट पाहताना निधी मात्र का वाहतो?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, पुलाची सध्याची अवस्था अत्यंत धोकादायक बनली असून २०१४ पूर्वीपासून ग्रामस्थ सातत्याने या पुलाची मागणी करत आहेत. हा मार्ग स्थानिक गावांना जोडणारा तसेच महामार्गाकडे जाणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा असल्याने दररोज हजारो नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थी जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. अनेक अपघात होऊनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
ग्रामस्थांचा आक्रोश...
माजी सरपंच आबासाहेब जवळकर यांनी सांगितले की, “२०१४ पासून आम्ही सातत्याने या कामाचा पाठपुरावा करत आहोत. माजी उपसरपंच तेजस शिवरकर, शंकर जवळकर, गणेश जवळकर, पारस वाल्हेकर, कैलास खटाटे तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. ‘आज सुरू होईल, उद्या सुरू होईल’ म्हणता म्हणता १२ वर्षे उलटली. आता तरी प्रशासनाने जागे होऊन पुलाचे काम पूर्ण करावे.”
प्रशासनाचे स्पष्टीकरण :
पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख म्हणाले, “मी या पदावर रुजू झाल्यापासूनची माहिती देऊ शकतो. मे २०२६ पर्यंत कालव्याचे आवर्तन आहे. त्यानंतर लगेचच पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात येईल. संबंधित कंत्राटदार काम सुरू करेल.”
एकीकडे खर्च वाढत असताना दुसरीकडे काम ठप्प असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. ग्रामस्थांच्या दृष्टीने हा पूल केवळ एक बांधकाम नसून जीवनावश्यक दुवा आहे. त्यामुळे आता तरी प्रशासनाने विलंब न करता काम सुरू करून पूर्ण करावे, अशी तीव्र मागणी नागरिकांकडून होत आहे.
Editer sunil thorat



