निलेश काळभोर शिवसेना जिल्हा संघटक यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा गुंडांचा प्रयत्न ; हॉटेलमध्ये पिस्तूल-चाकूसह दहशत…
“आज गेम वाजवायचा…” म्हणत हॉटेलमध्ये पिस्तूल-चाकूसह गुंडांची दहशत; चौघांवर गुन्हा...

कदमवाकवस्ती (ता. हवेली, दि. २०) : “आज गेम वाजवायचा…” असा आरडाओरडा करत चार जणांनी हॉटेलमध्ये घुसून पिस्तूल व चाकूच्या जोरावर दहशत माजवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी हॉटेल व्यावसायिक सूर्यकांत बापुसाहेब उंद्रे (वय ४०, रा. मांजरी खुर्द) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अस्लम अल्ताफ शेख, पम्या, आकाश (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) तसेच एका अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील माईलस्टोन ०९ या हॉटेलमध्ये रविवार (दि. १९ एप्रिल) रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. शनिवारी रात्री सुमारे ११ वाजता हॉटेल बंद केल्यानंतर उंद्रे व हॉटेल व्यवस्थापक नितेश हेगडे हे किचनमध्ये साफसफाईचे काम करत होते.
दरम्यान, पहाटे २ वाजण्याच्या सुमारास चार अनोळखी इसमांनी हॉटेलच्या प्रवेशद्वारावर येत सुरक्षारक्षकाला धमकावत गेट उघडण्यास भाग पाडले. आत प्रवेश करताच त्यांनी “निलेशदादा काळभोर कुठे आहेत?” अशी विचारणा करत हॉटेलमध्ये शोधाशोध सुरू केली. हॉटेल बंद असून आत कोणीही नसल्याचे उंद्रे यांनी सांगूनही आरोपींनी त्याकडे दुर्लक्ष केले.
या वेळी एका इसमाच्या हातात चाकू होता. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने उंद्रे व हेगडे यांनी समजावून सांगत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. ते बाहेर जात असतानाच जर्किन परिधान केलेला आणखी एक इसम आत आला. त्याच्या हातात पिस्तूल होते. त्याने उंद्रे यांचे नाव विचारत स्वतःचे नाव अस्लम अल्ताफ शेख असल्याचे सांगितले. तसेच “निलेश काळभोरचा आज गेम वाजवायचा होता” असे सांगत सर्व आरोपी बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये बसून तेथून पसार झाले.
घटनेनंतर उंद्रे यांनी तात्काळ ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
दरम्यान, निलेश काळभोर हे कदमवाकवस्ती येथील रहिवासी असून ते शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे जिल्हा संघटक म्हणून कार्यरत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
Editer sunil thorat



