वाघोलीत अंमली पदार्थ विरोधी पथकाची सलग दोन कारवायांत मोठी धडक; ५९ ग्रॅम ‘एमडी’सह २० लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघे अटकेत…

वाघोली (पुणे) : पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक क्रमांक २ ने वाघोली परिसरात अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध मोठी मोहीम उघडली असून, सलग दोन कारवायांमध्ये ड्रग्ज माफियांना मोठा दणका दिला आहे. या दोन्ही धडक कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण ४ आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ५९.३२५ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) या अंमली पदार्थासह तब्बल २० लाख ८० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे खराडी ते कारेगाव पट्ट्यातील अंमली पदार्थ विक्रेत्यांची मोठी साखळी उघडकीस आली आहे.
सविस्तर माहितीनुसार, पोलिसांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे १६ एप्रिल २०२६ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास केसनंद येथील थेऊर रोडवरील जोगेश्वरी वजनकाटा परिसरात पहिली सापळा कारवाई करण्यात आली. यामध्ये अनिस शम्मू सय्यद (रा. कल्याणी पार्क, मांजरी बुद्रुक) आणि हरी उत्तम उफाडे (रा. सिद्धार्थनगर, वाघोली) या दोन आरोपींना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ५.००५ ग्रॅम एम.डी. व इतर साहित्यासह २ लाख ६२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्याच्या समांतर तपासात पोलिसांनी फरार आरोपींचा कसून शोध घेत १७ एप्रिल रोजी प्रतिक ऊर्फ सोन्याबापू दत्तात्रय होले (रा. लोणीकंद) आणि १८ एप्रिल रोजी ऋषिकेश ऊर्फ राम अंकुश यनभर (रा. कारेगाव) या दोघांनाही शिताफीने अटक करून वाघोली पोलिसांच्या स्वाधीन केले.
पहिल्या गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध सुरू असतानाच, १८ एप्रिल २०२६ रोजी पथकाला दुसरे मोठे यश मिळाले. पुणे-नगर रोडवरील सिल्व्हर ओक हॉटेलच्या पार्किंग परिसरात एका संशयित व्यक्तीची झडती घेतली असता, त्याच्याकडे तब्बल ५४.३२ ग्रॅम एम.डी. हा अंमली पदार्थ आढळून आला. रमेश उदाराम सुतार (रा. योजनानगर, लोहगाव, मूळ रा. जालोर, राजस्थान) असे या आरोपीचे नाव असून, त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. २ च्या या सलग दोन कारवायांमुळे खराडी, वाघोली, लोणीकंद, शिक्रापूर, रांजणगाव आणि कारेगाव या भागातील अंमली पदार्थ विक्रेत्यांचे जाळे उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम राबवली जात आहे. या अंतर्गत यापुढेही अंमली पदार्थांची विक्री, सेवन आणि वाहतूक करणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जाणार असून, कुठेही गैरप्रकार आढळल्यास पोलिसांकडून अतिशय प्रखर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
Editer sunil thorat



