महाराष्ट्रात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश ; सातारा, सांगली, पुणे, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत मोठे फेरबदल…

सौजन्य फोटो AI
मुंबई : (दि. २० एप्रिल) महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने भा.पो.से. (IPS) अधिकाऱ्यांच्या बदली व पदस्थापनेबाबत महत्त्वपूर्ण शासन आदेश जारी केला असून राज्यातील अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मंत्रालयातून निर्गमित आदेशानुसार सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर, गडचिरोली, जळगाव, धुळे आणि वाशिम या जिल्ह्यांतील पोलीस अधीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदली करण्यात आल्या आहेत.
या आदेशानुसार तुषार दोशी यांची सातारा येथून सांगली जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. पुणे येथील पोलीस उप आयुक्त निखिल पिंगळे यांची सातारा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सांगलीचे विद्यमान पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची मुंबई येथे राज्य गुप्तवार्ता विभागात पोलीस उप आयुक्त (सुरक्षा) पदावर बदली करण्यात आली आहे.
कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांना गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. निलोत्पल यांची कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गडचिरोली येथे कार्यरत अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश यांना पदोन्नती देत पोलीस अधीक्षकपदी नियुक्त करण्यात आले आहे.
महेश्वर रेड्डी यांची जळगाव येथून राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. धुळेचे पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांची जळगाव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. पुणे येथील पोलीस उप आयुक्त राजकुमार शिंदे यांची वाशिम जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या बदली आदेशानुसार पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांना कायदा व सुव्यवस्था लक्षात घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित आदेश महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २२ (न) व २२ (न)(२) अन्वये सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात आला आहे.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने हे फेरबदल महत्त्वाचे मानले जात असून प्रशासनिक कार्यक्षमतेला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
Editer sunil thorat



