तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला ; तिघांवर गुन्हा दाखल, परिसरात खळबळ…

लोणी काळभोर , (ता. हवेली) ता. २४ : विवाह समारंभासाठी आलेल्या एका तरुणावर तिघांनी कोयत्याने व धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाठ टोलनाका परिसरात २० एप्रिल रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश सूर्यकांत पवार (वय २८, रा. वेताळबाबा वसाहत, हडपसर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुरेश बाबुराव गायकवाड (वय १८), कुणाल राहुल चौगुले (वय १८) व शुभम धर्मा सोलंकी (रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश पवार हे ऑनलाईन कुरिअर सेवा देत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ते कवडीपाठ टोलनाका परिसरातील एका विवाह समारंभाला उपस्थित होते. कार्यक्रम आटोपून ते रात्री सुमारे १०.३० वाजता दुचाकीवरून लक्ष्मी लॉन्स परिसरात पोहोचले असता, त्यांच्या मागून राखाडी रंगाच्या, नंबर प्लेट नसलेल्या डिओ दुचाकीवरून तीन जण आले.
या तिघांनी पवार यांची गाडी आडवी लावून त्यांना थांबवले व शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर एकाने त्यांची गच्ची पकडून कोयत्याने पाठीवर वार केला, तर दुसऱ्याने कमरेतील धारदार शस्त्राने डोक्यावर प्रहार केला.
अचानक झालेल्या या हल्ल्यात पवार यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. तिसऱ्या आरोपीने त्यांच्या डोळ्यांवर बुक्यांनी मारहाण केली, त्यामुळे ते जागीच कोसळले.
हल्लेखोरांनी त्यानंतर त्यांच्या दुचाकीचीही तोडफोड करत कोयत्याने वार करून नुकसान केले आणि घटनास्थळावरून फरार झाले. गंभीर जखमी अवस्थेत पवार यांनी लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्यांना तात्काळ ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांनी अधिकृत तक्रार नोंदवली.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पो उपनिरीक्षक प्रल्हाद जगताप पुढील तपास सुरू करत आहेत. आरोपींचा शोध घेऊन त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
Editer sunil thorat



