बुधवार पेठेत मध्यरात्री मोठी पोलिस कारवाई ; वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, अल्पवयीन मुलीची सुटका…

बुधवार पेठ (पुणे) : पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरात पोलिसांनी मध्यरात्री टाकलेल्या धाडीत मोठा वेश्या व्यवसाय उघडकीस आला असून या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. डिस्को आणि मॅचिस (मॅचबॉक्स) बिल्डिंगमध्ये सुरू असलेल्या या अवैध धंद्यावर पोलिसांनी एकाच वेळी छापा टाकत कारवाई केली. ही धाड रात्री सुमारे ११.३० वाजता सुरू झाली आणि पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू होती.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी एकूण १८ जणांना ताब्यात घेतले. त्यामध्ये ११ महिला वेश्या व्यवसाय करताना आढळून आल्या, तर ५ पुरुष हे या रॅकेटचे व्यवस्थापन, देखरेख आणि संचालन करत असल्याचे निष्पन्न झाले. याशिवाय एक अल्पवयीन मुलगी आणि एक लहान मुलगा देखील आढळून आले. कारवाईतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे १५ वर्षे ४ महिन्यांची अल्पवयीन मुलगी ही जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलण्यात आली होती. पोलिसांनी तिला तात्काळ त्या ठिकाणाहून मुक्त करून संरक्षणात घेतले असून तिच्या पुनर्वसनासाठी पुढील प्रक्रिया सुरू आहे.
तपासात उघड झाले की या रॅकेटमध्ये मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी नागरिकांचा सहभाग आहे. एकूण १५ बांगलादेशी नागरिक या कारवाईत आढळून आले असून त्यामध्ये ११ महिला, ३ पुरुष आणि एक लहान मुलाचा समावेश आहे. हे सर्वजण भारतात अनधिकृतरित्या राहत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला केवळ स्थानिक गुन्हा न मानता आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीच्या साखळीशी संबंध असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या संपूर्ण रॅकेटचा सूत्रधार म्हणून सुमित मिलिंद चव्हाण (वय ३३, मंगळवार पेठ, पुणे) याचे नाव समोर आले असून तोच या दोन्ही इमारतींमधून वेश्या व्यवसाय चालवत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्याला मदत करणारी ज्योती उर्फ सबीना शेख (वय ४०, पश्चिम बंगाल) ही ‘अक्का’ म्हणून महिलांवर नियंत्रण ठेवत होती. तसेच राहुल शर्मा (वय २४, उत्तर प्रदेश) आणि समीर हलवदार (वय २९, बांगलादेश) हे दोघे मॅनेजर म्हणून काम पाहत होते. इतर आरोपी हे ग्राहकांशी संपर्क साधणे, महिलांना पुरवठा करणे व व्यवहार हाताळणे अशी विविध कामे करत होते.
कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून मोबाईल फोन आणि व्यवहाराच्या नोंदी असलेल्या डायऱ्या जप्त केल्या आहेत. या पुराव्यांच्या आधारे या रॅकेटचे जाळे किती मोठे आहे, तसेच इतर कोणकोण या व्यवसायाशी संबंधित आहेत याचा तपास सुरू आहे. विशेषतः मोबाईलमधील डेटा आणि आर्थिक व्यवहारांच्या नोंदींमधून अनेक महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणात पोलिसांकडून मानवी तस्करी, अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा (PITA), अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण तसेच परदेशी नागरिकांचे बेकायदेशीर वास्तव्य या गंभीर गुन्ह्यांखाली कारवाई करण्यात येत आहे. सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.
दरम्यान, पोलिसांनी स्पष्ट केले आहे की पुणे शहरात सुरू असलेल्या अशा अनैतिक व्यवसायांवर कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. बुधवार पेठेतील ही कारवाई मोठा धक्का मानली जात असून, पुढील तपासात आणखी मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Editer sunil thorat



