डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कदमवाकवस्ती येथे वृक्षारोपण व शालेय साहित्य वाटप ; शिक्षणाचा संदेश कृतीतून अधोरेखित…

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : महामानव, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त कदमवाकवस्ती (पालखीतळ) येथे विविध सामाजिक उपक्रमांनी भरलेला कार्यक्रम उत्साहात पार पडला. राष्ट्रीय मांग गारुडी क्रांती सेना, लहुजी शक्ती सेना व भगवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात वृक्षारोपण आणि शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप दि. २७ रोजी सायंकाळी ७: ०० वाजण्याच्या सुमारास करण्यात आले.
जयंतीनिमित्त परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. निसर्गाचा समतोल राखणे ही काळाची गरज असल्याचे सांगत आयोजकांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर कदमवाकवस्तीतील गरजू शालेय विद्यार्थ्यांना वह्या, पेन, शैक्षणिक साहित्य वाटप करून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अभिजीत रामदास बडदे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांवर प्रकाश टाकताना सांगितले की, “शिक्षण हे केवळ साक्षरतेपुरते मर्यादित नसून ते माणसाला त्याच्या हक्कांची जाणीव करून देणारे प्रभावी शस्त्र आहे. ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे’ या त्यांच्या विचारातून अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळते. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा त्यांचा मंत्र आजही तितकाच प्रेरणादायी आहे.” शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन असून, विद्यार्थ्यांना साहित्य वाटप हा त्या विचारांना कृतीत उतरवण्याचा छोटासा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाचे आयोजन अभिजीत रामदास बडदे (अध्यक्ष, तंटामुक्ती समिती, कदमवाकवस्ती), विजय विठ्ठल सकट (अध्यक्ष, पुणे जिल्हा को. क., लहुजी शक्ती सेना) आणि विजय आप्पासाहेब बोडके (अध्यक्ष, राष्ट्रीय मांग गारुडी क्रांती सेना) यांनी केले होते.
कार्यक्रमाला सरपंच चित्तरंजन गायकवाड, माजी सरपंच गौरी गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य अविनाश बडदे, आकाश काळभोर, सिमीता लोंढे, अशोक शिंदे, युवा नेते सुहास काळभोर, सतीश काळभोर, ज्ञानेश्वर नामूगडे, दीपक काळभोर, माजी सदस्य नितीन लोखंडे, तुषार काळभोर, पृथ्वीराज काळभोर, बापूराजे गायकवाड, रोहन सपकाळ, सागर गायकवाड, अभिजीत पाचकुडवे, सिद्धेश कायगुडे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाला कार्यकर्ते, पालक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला. एकूणच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित हा कार्यक्रम सामाजिक जाणीव, पर्यावरण संवर्धन आणि शिक्षणाचा संदेश देणारा ठरला.
Editer sunil thorat





