पानातील नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या मादक गोळ्यांचा साठा जप्त; एक आरोपी अटकेत…

पुणे, दि. २९ एप्रिल २०२६ : शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठी कारवाई करत पानामध्ये नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित मादक गोळ्यांचा साठा जप्त केला असून या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
दि. २८ एप्रिल रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे तपास पथक गस्त घालत असताना पोलीस नाईक सचिन जाधव यांना खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दिनदयाळ हॉस्पिटलजवळील निर्जन रस्त्यावर एक मोटार टेम्पो संशयास्पद स्थितीत उभा आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील व त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
सदर ठिकाणी तपासणी केली असता टेम्पो बेवारस स्थितीत आढळून आला. संशय वाढल्याने पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित व बेकायदेशीर मादक ‘बंट्या’ गोळ्यांच्या पाकिटांनी भरलेल्या गोण्या आढळून आल्या. पोलिसांनी टेम्पोसह एकूण ३ लाख ३८ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासादरम्यान विष्णु रामरतन गुप्ता (रा. पिंपरी-चिंचवड, पुणे) याचे नाव निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली आहे.
दरम्यान, या गुन्ह्यात इतर आरोपींचा सहभाग आहे का, याचा शोध पोलीस घेत असून जप्त करण्यात आलेल्या ‘बंट्या’ गोळ्या अलीकडे पुण्यात ‘फुलचंद पान’मध्ये नशेसाठी वापरल्या जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अनुषंगानेही तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र बनसोडे, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक अमर काळंगे (गुन्हे) तसेच सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील व त्यांच्या पथकाने केली.
Editer sunil thorat



