
कदमवाकवस्ती (ता. हवेली) : आयुष्याच्या अर्धशतकाच्या टप्प्यावर पोहोचताना अनेक आठवणी, अनुभव आणि नात्यांची शिदोरी मनात साठलेली असते. अशाच भावना जपण्यासाठी स्वामी विवेकानंद संस्थेच्या जय हिंद हायस्कूलच्या १९९०-९१ च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत आपला सामूहिक ५० वा वाढदिवस कवडीपाट येथील मधुबन मंगल कार्यालयात अत्यंत उत्साहात आणि भावनिक वातावरणात साजरा केला. काहींचे वय ५०, तर काहींचे ५१-५२ पूर्ण झाले असले तरी “आपण सगळे एकत्र” या भावनेतून साजरा झालेला हा मेळावा मैत्रीचा सुवर्णक्षण ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत भावनिक वातावरणात झाली. दिवंगत वर्गमित्र शिक्षक महेश यशवंत आणि योगिता हडके यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी अनेकांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला आणि काही क्षणांसाठी संपूर्ण वातावरण भावुक झाले.
या स्नेहमेळाव्याच्या आयोजनात मधुबन मंगल कार्यालयाचे संचालक किशोर टिळेकर आणि अविनाश टिळेकर बंधूंचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या नियोजनामुळे कार्यक्रमाची प्रत्येक बाब सुबकपणे पार पडली. उपस्थितांनी त्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमात विविध मनोरंजनपर उपक्रमांची रेलचेल होती. नृत्य, मिमिक्री, खेळ यांसारख्या कार्यक्रमांनी उपस्थितांना पुन्हा एकदा शालेय दिवसांची आठवण करून दिली. “त्या काळात परत गेल्यासारखे वाटत आहे,” अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या. ढवळे सर यांच्या प्रभावी आणि विनोदी सूत्रसंचालनाने कार्यक्रमात रंगत आणली आणि प्रत्येक क्षण अधिक संस्मरणीय बनवला.
नवनाथ मोरे, अमोल दुगाणे आणि अर्चना यांनी सादर केलेल्या सुरेल गीतांनी वातावरण प्रसन्न केले. त्यांच्या गायनाने उपस्थित मंत्रमुग्ध झाले. याशिवाय परिचय सत्रामध्ये सर्वांनी पुन्हा एकदा स्वतःची ओळख करून दिली. अनेक वर्षांनंतर भेटलेल्या मित्रमैत्रिणींनी आपल्या आयुष्यातील प्रवास, अनुभव आणि यशोगाथा शेअर केल्या.
किशोर टिळेकर आणि स्वाती यांनी सादर केलेल्या कवितांनी कार्यक्रमाला एक वेगळीच भावनिक किनार दिली. त्यांच्या शब्दांतून मैत्री, आठवणी आणि आयुष्याच्या प्रवासाचे सुंदर चित्र उभे राहिले.
या स्नेहमेळाव्यासाठी सावित्री, अर्चना वट्टवर, रुपाली खंडेलवाल आणि अनीता चावट या मैत्रिणींनी दूरवरून आवर्जून उपस्थिती लावली. त्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला अधिक उत्साह लाभला.
या बॅचमधील अनेक जण विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत आहेत. राजकारण, शिक्षण, वैद्यकीय, कायदा आणि व्यवसाय क्षेत्रात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व बाजार समितीचे माजी सभापती नंदू पाटील काळभोर, बाजार समितीचे माजी संचालक शिवदास बापू काळभोर, सामाजिक कार्यकर्ते व व्यवसायीक विकास तिखे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभली. तसेच डॉक्टर, शिक्षक, वकील आणि उद्योजक म्हणून कार्यरत असलेल्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी या मेळाव्याला उपस्थिती लावली.
या सर्व उपक्रमामागील प्रमुख सूत्रधार स्मिता तिवारी (गुड्डी) हिने सर्वांना एकत्र आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे विशेष कौतुक करण्यात आले. दीर्घ काळानंतर सर्व मित्रमैत्रिणींना एकत्र आणणे हे सोपे काम नसतानाही तिच्या चिकाटीमुळे आणि जिद्दीमुळे हा स्नेहमेळावा यशस्वी झाला, असे सर्वांनी नमूद केले.
कार्यक्रमात वेलकम ड्रिंकपासून हाय टीपर्यंत प्रत्येक गोष्टीत जिव्हाळा आणि आपुलकी दिसून आली. वर्गमित्रांनी दिलेल्या प्रायोजकत्वामुळे कार्यक्रम अधिक भव्य आणि देखणा झाला.
एकूणच, हा स्नेहमेळावा केवळ वाढदिवसाचा सोहळा न राहता, मैत्रीचे बंध अधिक दृढ करणारा, आठवणींना उजाळा देणारा आणि आयुष्याच्या “दुसऱ्या इनिंग”ची सकारात्मक सुरुवात करणारा ठरला. पुढील आयुष्य आनंदी, निरोगी आणि समाधानाने भरलेले जावे, अशी भावना सर्वांनी व्यक्त केली.
Editer sunil thorat




