आरोग्य : अनेक लोकांना लघवी केल्यानंतर तहान लागते आणि ते एक ग्लास पाणी पितात. शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी असे करावे, असे लोकांना वाटते. तर काही लोकांचा असा विश्वास आहे की लघवी केल्यानंतर पाणी प्यायल्याने किडनी स्टोन सह अनेक गंभीर आजार होऊ शकतात.
इंटरनेटवर तुम्हाला असे अनेक अहवाल मिळतील, जे दावा करतात की लघवी केल्यानंतर पाणी प्यायल्याने किडनीचे आजार होऊ शकतात. खरंच लघवी केल्यानंतर पाणी पिऊ नये का? डॉक्टरांकडून याचे सत्य जाणून घेऊया…
सर गंगाराम हॉस्पिटल, नवी दिल्ली येथील युरोलॉजी विभागाचे उपाध्यक्ष डॉ. अमरेन्द्र पाठक यांनी एका न्युज चॅनेल ला सांगितले की तहान लागणे ही आपल्या शरीराची एक शारीरिक प्रक्रिया आहे. जेव्हा आपल्या रक्तातील पाणी कमी होऊ लागते, तेव्हा आपल्याला तहान लागू लागते. अनेक लोक कमी पाणी पितात, तर काही लोकांना जास्त तहान लागते. हे सर्व लोकांच्या हायड्रेशनवर अवलंबून असते. जेव्हा तहान लागेल तेव्हा लोकांनी पाणी प्यावे. तहान नसताना जबरदस्तीने पिऊ नये. जास्त पाणी प्यायल्याने आपले हृदय आणि किडनी जास्त काम करतात. अशा स्थितीत लोकांनी पाणी पिण्याकडे लक्ष द्यावे.
डॉ. पाठक म्हणाले की, लघवी केल्यानंतर पाणी प्यायल्याने शरीराला कोणताही धोका होत नाही. जर तुम्हाला लघवी केल्यानंतर लगेच तहान लागली, तर तुम्ही पाणी पिऊ शकता. लघवी केल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने किडनीचे आजार होऊ शकतात असे मानणारे लोक पूर्णपणे चुकीचे आहेत. वैद्यकीय विज्ञानात, लघवीनंतर पाणी पिणे कोणत्याही प्रकारे हानिकारक मानले जात नाही. रात्री वारंवार लघवीला जावे लागणाऱ्या रुग्णांनाच रात्री लघवीनंतर कमी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. अशा लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला जातो.
युरोलॉजिस्टच्या मते, जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी जास्त पाणी प्यायले, तर तुम्हाला लघवीसाठी अनेक वेळा उठावे लागेल, ज्यामुळे तुमच्या झोपेत व्यत्यय येऊ शकतो. खरं तर, लोक रात्री लघवी केल्यानंतर एक किंवा दोन ग्लास पाणी पितात, ज्यामुळे त्यांना पुन्हा पुन्हा लघवीला जावे लागते. अशा लोकांना रात्री तोंड कोरडे पडण्याची समस्या असल्यास, ते दोन घोट पाणी पिऊ शकतात. यामुळे तुमचे घसा कोरडे होण्यापासूनही वाचेल आणि तुम्ही जास्त पाणी पिणेही टाळू शकाल. शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी, लोकांनी दिवसभर १.५ ते २ लिटर पाणी प्यावे, पण तहान नसताना यापेक्षा जास्त पिऊ नये.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा