पुणे (हवेली) : लोणी काळभोर येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील महिला लेखापालानेच शाळेच्या तिजोरीवर डल्ला मारून सुमारे १७ लाखांचा अपहार केला असल्याचा प्रकार घडकीस आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी तत्काळ महिलेला अटक केली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी संस्था चालक संजय वसंत मोडक (वय ५३, रा. डी- ७०१, पर्ल टॉवर, गाडीतळ हडपसर पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शितल व्यंकटेश गोरे (वय ४०, पत्ता सर्वे नंबर २१५, संस्कृती कॉलनी, भेकराई नगर फुरसुंगी पुणे) लेखापाल महिलेला अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी संजय मोडक यांची लोणी काळभोर ( ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत मोडक इंटरनॅशनल स्कूल या नावाने इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या शाळेमध्ये शितल गोरे या लेखापाल म्हणून काम करीत होत्या. शितल गोरे यांनी १० जानेवारी २०२३ ते २१ जून २०१५ या कालावधीत शैक्षणिक शुल्काचे ८ लाख ४९ हजार ३०० रुपये, प्री प्रायमरी शुल्काचे १ लाख ५७ हजार २७७ रुपये व स्कुल युनिफॉर्म शुल्काचे ४ लाख ३८ हजार ८१० रुपये असे एकुण १४ लाख ४५ हजार ३८८ रुपयांचा परस्पर अपहार करुन संस्थेची फसवणुक केली आहे. तसेच ही फसवणुक लपवण्यासाठी शितल गोरे यांनी मोडक इंटरनॅशलन स्कुलच्या कार्यालयात अनाधिकृतपणे प्रवेश करुन केबीनमधील २ लाख ४४ हजार रुपयांची रोकड असा एकूण १६ लाख ८९ हजार ३८८ रुपयांचा अपहार केला आहे. तसेच हिशोबाचे ८ रजिस्टर, पावत्या बुक इत्यादी चोरुन नेले आहे.
या प्रकरणी मोडक यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार शितल गोरे यांच्यावर भारतीय दंड संहीता कलम ४२०, ४०६, ३८१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच, लोणी काळभोर पोलिसांनी शीतल गोरे यांना मोठ्या शिताफीने अटक केली आहे.
ही कामगिरी हडपसर परिमंडळ पाच चे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट, पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार, पोलीस नाईक दिगंबर जगताप, अंमलदार मंगेश नानापुरे, संदीप धुमाळ, व मल्हारी ढमढेरे यांच्या पथकाने केली आहे.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा