लिफ्ट देण्याचा बहाणा ; महिलेला लुटणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल…

तुळशीराम घुसाळकर
लोणी काळभोर : जेजुरी–उरुळी कांचन रस्त्यावर एका महिलेला लिफ्ट देण्याचा बहाणा करत तिच्या गळ्यातील तब्बल ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरून नेण्याची धाडसी घटना घडली आहे. अवघ्या पाच मिनिटांत तिघांनी ही चोरी करून पसार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
ही घटना गुरुवार, २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.२५ ते ५.३० च्या दरम्यान शिंदवणे (ता. हवेली) येथील कामठे बसस्टॉप ते काळे शिवार परिसरात घडली.
फिर्यादीनुसार, निर्मला दिलीप शिर्के (वय ५५) या बसची वाट पाहत असताना जेजुरीकडून एक काळ्या रंगाची चारचाकी कार त्यांच्या शेजारी येऊन थांबली. कारमध्ये एक अनोळखी पुरुष आणि दोन अनोळखी महिला होत्या. लिफ्ट देण्याचा बहाणा करत महिलेस गाडीत बसविण्याचा प्रयत्न झाला. त्याचवेळी कारमधील दोन्ही महिलांनी अचानक शिर्के यांच्या गळ्यातील ९ ग्रॅम वजनाचे काळ्या-सोन्याच्या मण्यात ओवलेले व पेंडल असलेले गंठण जबरदस्तीने हिसकावले आणि कार वेगाने निघून गेली.
चोरट्यांनी चेहऱ्याचे स्पष्ट वर्णन मागे ठेवले नाही तसेच कारचा नंबरही लक्षात आला नाही, असे फिर्यादीत नमूद केले आहे.
या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात तीन इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरीचा तपास पोलीस हवालदार प्रशांत पवार करीत आहेत.
रस्त्यावर लिफ्ट देण्याच्या नावाखाली महिलांना लक्ष्य करणारी ही घटना धक्कादायक असून पोलिसांनी कारचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे फिरवली आहेत.
Editer sunil thorat



