भांडण मिटवायला गेला.. अन् अल्पवयीन पोरांनी कोयत्याने वार केला..! ३ हल्लेखोर अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेवून त्यांची रवानगी बाल न्यायालय ; पणदरे

मल्लिकार्जुन हिरेमठ / बारामती
पुणे (बारामती) : बारामती तालुक्याच्या पणदरे गावातील. अल्पवयीन मुलांची भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या २१ वर्षे युवकावर अल्पवयीन पोरांनी कोयत्याने वार केले. ही घटना काल २५ जानेवारी रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान पणदरे येथील सूतगिरणीच्या परिसरात घडली.
या संदर्भात निलेश रामदास जगदाळे या पंढरी येथील युवकाने पोलिसांकडे फिर्याद दिली त्यावरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. ती थोडक्यात माहिती अशी पणदरे गावातील नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या कॉलेज समोर रस्त्याने निलेश जगदाळे जात असताना कॉलेजच्या गेटच्या आत काही मुलांमध्ये भांडण चालू होते.
जगदाळे हे गेटमधून आत मध्ये गेले, तेव्हा मुलांमध्ये एकमेकांना पाहण्यावरून भांडणे सुरू होती. ही भांडणे मिटवायची म्हणून जगदाळे आणि सगळी अल्पवयीन मुले पणदरेच्या सूतगिरणी परिसरात पोहोचल्यानंतर दोन गटातील अल्पवयीन मुलांच्या भांडणात एका मुलाने जगदाळे यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला. तो वार चुकवण्याच्या प्रयत्नात जगदाळे याच्या दोन्ही हातावर कोयत्याचे वार झाले.
जगदाळे यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109, 351(3), 117(4), 189(2), 190, 191(2), 191(3) शस्त्र अधिनियम कलम 3/25, 4/25 या प्रमाणे गुन्हा दाखल केला. या घटनेतील ३ हल्लेखोर अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेवून त्यांची रवानगी बाल न्यायालय, पुणे येथे केली. उर्वरित मुलांचा पोलीस शोध घेत आहेत.
या गुन्ह्याचा पुढील तपास अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. श्री. सुदर्शन राठोड व सहायक निरीक्षक सचिन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक अमोल खटावकर हे करीत आहेत.



