बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने महिलेच्या हॅन्ड बॅग मधून साडेतीन लाख रुपये किंमतीचे पावणे ५ तोळ्याच्या दागिन्यांची चोरी..

पुणे (हडपसर) : पीएमटीने हडपसर ते सासवड या दरम्यान प्रवास करताना बसमध्ये असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने एका महिलेच्या हॅन्ड बॅगमधील चालू बाजारभावाप्रमाणे सुमारे साडेतीन लाख रुपये किंमतीचे पावणे ५ तोळ्याच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना घडली आहे.
ही घटना हडपसर गाडीतळ ते फुरसुंगीच्या दरम्यान शनिवार (२५ जानेवारी) रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी कविता देवीदास जगताप (वय ३५, रा. स्वप्नपर्ती अपार्टमेन्ट, कदमवाकवस्ती, कवडीपाट टोलनाक्याजवळ, ता. हवेली, जिल्हा पुणे) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कविता जगताप या गृहिणी असून कुटुंबासोबत कदमवाकवस्ती परिसरात राहतात. त्या त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त शनिवारी सासवडला चालल्या होत्या. त्यांनी हडपसर गाडीतळ येथील सासवडच्या दिशेने जाणारी पीएमटी बस सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास पकडली. त्यावेळी बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती. गाडीतळ ते फुरसुंगी फाटा दरम्यान जगताप यांच्या डाव्या खांदयाला अडकविलेल्या सफेद रंगाच्या हॅन्ड बॅगमधील निळ्या रंगाचा पाऊच व त्यामध्ये असलेले २.५ तोळयाचे सोन्याचे एक गंठण, १.५ तोळयाचे सोन्याची एक चैन व ५ ग्रॅम व २ ग्रॅमच्या सोन्याच्या दोन अंगठ्या असे निळया पाऊचसह कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले.
सदर बाब कविता जगताप यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ हडपसर पोलीस ठाणे गाठले. आणि चालू बाजारभावाप्रमाणे सुमारे साडेतीन लाख रुपये किंमतीचे ४ तोळे व ७ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची फिर्याद हडपसर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार हडपसर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार समीर पांडुळे करीत आहेत.



