८ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, लोणी काळभोर पोलीस व गुन्हे शाखा युनीट सहाच्या पोलिसांचा छापा

पुणे (हवेली) : गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याच्या अड्ड्यावर लोणी काळभोर पोलीस व गुन्हे शाखा युनीट सहाच्या पोलिसांनी छापा टाकून अड्डा उध्वस्त केला आहे. या छाप्यात एकावर गुन्हा दाखल करून सुमारे ८ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलीस हवालदार कानीफनाथ रंगनाथ कारखेले यांनी सरकारच्या वतीने दिलेल्या फिर्यादीवरून दारू तयार करणारा मुकेश करमावत (वय ५०, रा. गणेशनगर, नवरत्न गोडाऊनजवळ, मंतरवाडी, फुरसुंगी, पुणे) याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लोणी काळभोर (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील रामदरा डोगराच्या पायथ्याशी असलेल्या ओढ्याच्या जवळ गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या वाजण्याच्या सुमारास केली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांची तपासणी व अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनीट सहाचे एक पथक लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री गस्त घालत होते. गस्त घालत असताना, पथकातील पोलीस अंमलदार शेखर काटे यांना एका खबऱ्या मार्फत रामदरा डोगराच्या पायथ्याशी असलेल्या ओढ्याच्या बाजुला हातभट्टी दारू तयार करण्यात येत आहे, अशी माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी लोणी काळभोर पोलीस व गुन्हे शाखा युनीट सहाच्या पथकाने सदर ठिकाणी तात्काळ छापा टाकुन तयार हातभट्टी दारु, रसायन व हातभट्टी तयार करण्या करीता लागणारे साहित्य असा एकूण ८ लाख ३५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी गावठी हातभट्टीची दारू तयार करत असलेल्या मुकेश करमावत याला पोलीस आल्याची चाहुल लागल्याने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन तो फरार झाला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या पोलीस हवालदार राणी खामकर करीत आहेत.
सदरची कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, लोणी काळभोर पोलीस ठाणेच्या तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस हवालदार कानीफनाथ कारखेले, गणेश सातपुते, संभाजी देविकर, विलास शिंदे, रामहरी वनवे, पोलीस अंमलदार पोलीस अंमलदार शेखर काटे, बाजीराव वीर, योगेश पाटील, राहुल कर्डीले, प्रदिप गाडे, चक्रधर शिरगीरे यांच्या पथकाने केली आहे.



