विमानतळाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा, पुरंदर

पुणे (परंदर) : पुरंदर तालुक्यात प्रस्तावित असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्गी लागण्याच्या दृष्टीने आखणी एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. या विमानतळासाठी भूसंपादनाची अधिसूचना महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
त्यामुळे लवकरच विमानतळाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुरंदर विमानतळ हे पूर्वी निश्चित झालेल्या म्हणजेच वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव याच ठिकाणी होणार असल्याचे स्पष्ट झाले. ‘एमआयडीसी’कडून सूचना प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून भूसंपादनाची कार्यवाही केली जाणार आहे. भूसंपादन करताना रिंगरोड, समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर शेतकऱ्यांना मोबदला दिला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.दरम्यान, या विमानतळासाठी सात गावांपैकी सर्वाधिक क्षेत्र हे पारगावमधील संपादित होणार आहे. या गावातील एक हजार ५४२ सर्व्हे क्रमांकामधील ९७२.६७९ हेक्टर जागा संपादित होईल. खानवडी गावातील ३८१ सर्व्हे क्रमांकामधील ४५१.८८० हेक्टर जागा, कुंभारवळणमधील ४२४ सर्व्हे क्रमांक बाधित होत असून, या गावातील ३४१.६९० हेक्टर क्षेत्राचे संपादन होईल. वनपुरी गावातील ३६२ सर्व्हे क्रमांक बाधित होत असून, त्यातील ३३०.८९० हेक्टर जमीन, उदाचीवाडीमधील १९९ सर्व्हे क्रमांकामधील २४०.४७० हेक्टर जमीन, एखतपूरमधील १४५ सर्व्हे क्रमांक बाधित होत असून, त्यातील २१४.३३० हेक्टर आणि मुंजवडीमधील २२१ सर्व्हे क्रमांकामधील १२२.०४३ हेक्टर जमीन संपादित होणार आहे.



