पोलिस हवालदारानेच शेतात थाटला ड्रग्जचा कारखाना, तब्बल १७ कोटींचं ड्रग्ज जप्त केलं, प्रमोद केंद्रे हा मुंबई पोलिसांचा कर्मचारी…

लातूर (चाकूर) : माळरानावर पत्र्याचं शेड तेही गंजलेलं. जुनाट घर, आत कांद्याची चाळ. एखादा फॅन एखादी खुर्ची, अस्ताव्यस्त पसरलेलं सामान आणि काही तरी केमिकल एक्स्पिरिमेन्ट करणारं पात्र. हा सगळा सेटअप कसला होता माहित आहे का? चला जाणून घेऊया…
ड्रग्जचा कारखाना! बसला नाही धक्का खाकी वर पुन्हा डाग,
लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातल्या रोहिणी शिवारात जिथे पोलिसांनी धाड टाकली. तिथं तब्बल १७ कोटींचं ड्रग्ज जप्त केलं आहे. शिवाय पाच जणांना अटक केली आहे. या कारखान्याचा म्होरक्या आहे, प्रमोद केंद्रे. बरं सर्वात धक्कादायक गोष्ट ही आहे की प्रमोद केंद्रे हा मुंबई पोलिसांचा कर्मचारी आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा ड्रग्जचा कारखाना माळरानावर थाटला कसा गेला? प्रमोद केंद्रे हा मुंबई पोलीस दलात कार्यरत होता. त्यावेळी त्याची मुंबईतल्याच एका ड्रग्ज तस्कराशी ओळख झाली. ड्रग्ज तस्कराने केंद्रेला ड्रग्ज तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं होतं. यातून अमाप पैसा मिळेल हे केंद्रेलाही समजलं. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी केंद्रेनं आपल्या गावाकडे माळरानावर शेड मारलं. शेडमध्ये ड्रग्ज निर्मितीची उपकरणे बसवली. त्यानंतर त्यातून ड्रग्ज निर्मिती सुरु केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
ड्रग्ज निर्मिती सुरु होती. त्यातून बक्कळ पैसा मिळत होता. पण काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी एका ड्रग्ज पेडलरला अटक केली. त्याच ड्रग पेडलरला दांडक्याचा प्रसाद दिल्यानंतर, त्याने प्रमोद केंद्रेच्या ड्रग्जच्या कारखान्याचा पत्ता सांगितला. पोलिसांनी पाळत ठेवली. आणि अखेर प्रमोदला बेड्या पडल्या. प्रमोदसह जुबेद हसन मातकर, मोहम्मद असलम खान, अहमद कलीम शेख आणि खाजा शफिक मोमीन यांनाही अटक केली आहे.
अटक केलेल्यांना घेवून पोलिस कारमधून लातूरच्या दिशेने ते निघाले होते. लातूररोड येथील एका हॉटेलजवळ आल्यानंतर कारमध्ये पाठीमागे बसलेल्या संशयित आरोपीने अचानक चालकाला मारहाण करण्यास सुरवात केली. कारचे स्टेअरिंग वळवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कारमधील पथक प्रमुखांच्या प्रसंगावधानामुळे त्यास पळून जाता आले नाही. मात्र,भरधाव वेगातील कारने एका दुचाकीला धडक दिली. त्यानंतर प्रश्न असा आहे, की ड्रग्ज बनवण्याचे कारखाने असे कोणत्याही माळरानावर उगवू लागले. त्यातून ड्रग्ज राजरोसपणे बाहेर पडू लागले. तर ड्रग्जचा हा विळखा सुटणार कसा? हा ड्रग्जचे आणखीन कुठे लागे बांधले आहेत का? याचा तपास पोलीस अधिकारी कशा प्रकारे करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार…



