
पुणे (हवेली) : लोणी काळभोर येथील कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रीय पातळीवर आपले नावलौकिक सिद्ध करत रामेश्वरम (तामिळनाडू) येथे झालेल्या राष्ट्रीय STEM इनोव्हेशन स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या 10 व्या स्मृती दिनानिमित्त आयोजित या स्पर्धेत विद्यार्थिनींच्या दोन्ही प्रकल्पांनी परीक्षकांची मनं जिंकली असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
या स्पर्धेचे आयोजन डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्यावतीने करण्यात आले होते. महाराष्ट्रातून एकूण तीन शाळांनी सहभाग नोंदवला होता, त्यापैकी लोणी काळभोर येथील कन्या प्रशालेच्या दहावीच्या विद्यार्थिनींनी –
🔹 प्रतीक्षा रमेश लोंढे,
🔹 शुभांगी बंडू मुस्तक,
🔹 तनिषा मारुती काळभोर,
🔹 सानिका दादा काळभोर
यांनी ‘धोक्याची सूचना प्रणाली’ आणि ‘क्षैतिज रोबोटिक्स आधारित AI प्रकल्प’ सादर केले.
विद्यार्थिनींचे प्रकल्प व संकल्पना
1. “अपघात टाळण्यासाठी धोक्याची सूचना” – थीम : स्मार्ट वाहतूक आणि गतिशीलता उपाय
यामध्ये विद्यार्थिनींनी इन्फ्रारेड सेन्सर तंत्रज्ञानाचा वापर करून अशी प्रणाली तयार केली आहे की, वाहन समोरून येणाऱ्या इन्फ्रारेड किरणांवर प्रतिक्रिया देऊन सायरन वाजतो व वाहन आपोआप थांबते, जे अपघात टाळण्यासाठी उपयुक्त ठरते.
2. “कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी क्षैतिज रोबोटिक्स – निवडा आणि ठेवा प्रणाली” – थीम : सामाजिक हितासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता या प्रकल्पात ट्रान्सपोर्ट आणि लॉजिस्टिक सेक्टरमध्ये वापरासाठी उपयुक्त रोबोट प्रणाली सादर केली. ही प्रणाली वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अचूक आणि कमी वेळेत हलवते, याचा उपयोग बांधकाम, बंदर, विमानतळ, सैन्य क्षेत्रात होऊ शकतो.
पुरस्कार वितरण व गौरव…
या प्रकल्पांचे सादरीकरण परीक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले. विद्यार्थिनींना भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायण यांच्या हस्ते सुवर्ण पदक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. त्यांना डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नातू सलीम शेख यांचेही मार्गदर्शन लाभले.
मार्गदर्शक व संस्थांचा महत्त्वपूर्ण सहभाग…
या प्रकल्पासाठी विज्ञान शिक्षक पी. व्ही. पाटील यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
प्रकल्पासाठी आवश्यक निधी FIS Global India चे प्रमुख मयुर गांगोर्डे, आणि Supportnam Trust for the Disabled (Bangalore) यांच्या सीएसआर फंडातून मिळवून देण्यात आला.
प्रकल्प व्यवस्थापनासाठी लोकेश व प्रियांका यांनी विशेष सहकार्य केले.
शाळेचा सत्कार व सन्मान…
या अभिमानास्पद कामगिरीबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका संजिवनी बोरकर यांनी विद्यार्थिनी व शिक्षकांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या यशामुळे लोणी काळभोर गावाचा व कन्या प्रशालेचा राष्ट्रीय स्तरावर लौकिक वाढला असून, ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
Editer Sunil thorat










