कामगाराची आत्महत्या ; इंडियन ऑईल टर्मिनलच्या सुपरवायझरसह ६ जणांवर गुन्हा…

तुळशीराम घुसाळकर
पुणे (हवेली) : पत्नीच्या विनयभंगाच्या प्रकरणी वरिष्ठांकडे तक्रार केल्याचा राग धरून पत्नीला कामावरून कमी करणे, पतीलाही नोकरीवरून काढण्याची धमकी देणे आणि सतत मानसिक त्रास दिल्यामुळे कामगाराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आत्महत्येपूर्वी त्याने व्हिडिओ क्लीप रेकॉर्ड करून राहत्या घरातील लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला.
मृत कामगाराचे नाव तुकाराम ज्ञानेश्वर भाले (वय ३८, रा. लोणी काळभोर) असे आहे. त्यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून सुनिल विजय कसबे, सारिका उर्फ सावित्री सुनिल कसबे, सुनिता विजय कसबे, करण काळु कसबे (सर्व रा. गारुडीवस्ती, लोणी काळभोर) तसेच अक्षय केवट, अजित सिंग (दोघेही रा. कदमवाकवस्ती) यांच्यावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अक्षय केवट हा भाले यांच्या पत्नीशी अश्लील बोलणे, छेडछाड व विनयभंग करीत असे. पती-पत्नीने या प्रकरणाची तक्रार कंपनीच्या वरिष्ठांकडे केल्यानंतर सुपरवायझर अजित सिंग व सुनिल कसबे यांनी पीडितेला नोकरीवरून काढले. त्यानंतर तुकाराम भाले यांनाही कामावरून काढण्याची धमकी देत मानसिक छळ सुरू ठेवला. अखेर त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली.
व्हिडिओ क्लीपमध्ये त्यांनी “या चार पाच जणांनी माझा कामधंदा, पैसा बुडवला, मला वाटेला लावले” असे सांगितले आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील करत आहेत.
Editer sunil thorat




