चुकांवर काम, सातत्याचा मंत्र ; ‘एमआयटी एडीटी’मध्ये विजेंदर सिंहांचे प्रेरणादायी विचार…

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणेच घडेल असे नाही. यश आणि अपयश ही कुठल्याही खेळाडूच्या आयुष्याची अविभाज्य अंगे आहेत. यश मिळाल्यावर अहंकार न बाळगता आणि अपयश आले तरी खचून न जाता सातत्याने प्रयत्न करत राहणे, हीच खरी खेळाची शिकवण आहे. कुठलाही खेळ निवडला तरी तो पूर्ण समर्पण, चिकाटी आणि स्वतःतील सर्वोत्तम देऊन खेळावा. अपयशासाठी इतरांवर दोष न ढकलता जबाबदारी स्वीकारून स्वतःच्या चुकांवर प्रामाणिकपणे काम केल्यास, कोणताही खेळ असो, यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन ऑलिंपियन मुष्ठीयोद्धा विजेंदर सिंह यांनी केले.
एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (एमआयटी एडीटी) विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे यांच्या वतीने आयोजित आठव्या विश्वनाथ स्पोर्ट मिट (व्हीएसएम–२०२६) या वर्षातील सर्वांत मोठ्या राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन व आंतरविद्यापीठीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या उद्घाटन सोहळ्यास भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) अंतर्गत नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्था (एनएसएनआयएस) यांचे उपमहासंचालक व वरिष्ठ कार्यकारी संचालक विनित कुमार, मेजर ध्यानचंद पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू तृप्ती मुरगुंडे, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष व कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड, कार्यकारी संचालक डॉ. सुनीता कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., एव्हरेस्टवीर डॉ. सारा सफारी, अर्जुन पुरस्कारप्राप्त मुष्ठीयोद्धा मनोज पिंगळे, प्र-कुलपती डॉ. रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुराज भोयार, क्रीडा संचालक प्रा. पद्माकर फड, स्पर्धेच्या सह-समन्वयक डॉ. प्रतिभा जगताप यांच्यासह मान्यवर, प्रशिक्षक, खेळाडू व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजेंदर सिंह पुढे म्हणाले की, सध्या भारतात क्रीडा क्षेत्राचा सुवर्णकाळ सुरू आहे. एकेकाळी पालक आपल्या मुलांना केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा आग्रह धरत असत; मात्र आज परिस्थिती बदलली असून क्रीडा क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहिले जात आहे. सरकारच्या धोरणांमुळे तसेच क्रीडा क्षेत्रातील यशामुळे पालकही आपल्या पाल्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत आहेत. अशा सकारात्मक वातावरणात एमआयटी एडीटी विद्यापीठाकडून एवढ्या भव्य स्तरावर राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन होणे अत्यंत प्रेरणादायी आहे. विद्यापीठात उपलब्ध असलेल्या जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा खेळाडूंना निश्चितच पुढे जाण्यास मदत करतील, असे कौतुकही त्यांनी यावेळी केले.
कार्यकारी संचालक डॉ. सुनीता कराड यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भारतातील क्रीडा संस्कृती झपाट्याने विकसित होत आहे. सध्या पुण्यात सुरू असलेल्या ग्रँड टूर सायकल स्पर्धेमुळे संपूर्ण शहर क्रीडामय वातावरणात रंगले आहे. ऑलिंपिक, राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धांसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंचा सहभाग आणि यशाचा टक्का वाढावा, यासाठी शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागातील खेळाडूंना त्यांच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी विद्यापीठ स्तरावरच सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उद्देश विश्वनाथ स्पोर्ट मिटच्या माध्यमातून साध्य केला जात असून, त्याच अनुषंगाने एमआयटी एडीटी विद्यापीठात जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा उभारण्यात आल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाची सुरुवात विश्वशांती प्रार्थनेने करण्यात आली. त्यानंतर स्पर्धेचा ध्वज फडकवून मॅनेट कॅडेटतर्फे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली. राष्ट्रगीताने उद्घाटन सोहळ्याची सांगता करण्यात आली. स्पर्धा नियोजन समितीचे अध्यक्ष व कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस. यांनी प्रास्ताविक केले, तर आभार क्रीडा संचालक प्रा. पद्माकर फड यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. अशोक घुगे, डॉ. स्वप्निल शिरसाट आणि प्रा. स्नेहा वाघटकर यांनी केले.
Editer sunil thorat



