सुरक्षा रक्षकाला मारहाण करून लूटमार : चौघांविरोधात गुन्हा दाखल…

तुळशीराम घुसाळकर
लोणी काळभोर (ता. हवेली) : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून रिक्षाने प्रवास करीत असलेल्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करून लुटल्याची धक्कादायक घटना हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील दत्त मिसळ हॉटेलसमोर घडली. या प्रकरणी चार अनोळखी इसमांविरोधात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवार (७ सप्टेंबर) रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये नामदेव विकास पवार (वय २३, रा. शितळादेवी मंदिराजवळ, पाडवदंड रोड, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे, मुळगाव उदतपूर, ता. लोहारा, जि. धाराशिव) हे जखमी झाले आहेत. आरोपींनी पवार यांच्याकडील १८ हजार रुपये किंमतीचा मोबाईल हॅन्डसेट, ३,५०० रुपयांची रोकड, तसेच आधारकार्ड, पॅनकार्ड, एटीएम कार्ड असा मुद्देमाल लंपास केला.
घटनाक्रम पुढिल प्रमाणे…
नामदेव पवार हे खाजगी सुरक्षा रक्षकाचे काम करतात. ते रविवारी एमएच-१२ केआर-२०७० क्रमांकाच्या रिक्षातून कामावर चालले होते. रिक्षामध्ये आधीच चार अनोळखी इसम बसलेले होते. रिक्षा कदमवाकवस्ती येथील दत्त मिसळ हॉटेलसमोर पोहोचताच चालकाने रिक्षा बाजूला घेतली. त्याचवेळी रिक्षाचालकासह इतर तिघांनी पवार यांच्यावर लाथाबुक्क्यांचा सपाटा हाणला. त्यांना रिक्षातून खाली ढकलून दिले. या हल्ल्यात त्यांच्या टाचेला जखम झाली असून मांडीवरही मुक्कामार बसला आहे.
आरोपींची वैशिष्ट्ये…
रिक्षाचालक : केस लांब, शरीराने मजबूत, वय अंदाजे २५ वर्षे.
त्याच्याजवळ बसलेला इसम : सडपातळ, केस बारीक, वय अंदाजे २५ वर्षे.
मागील सीटवर डाव्या बाजूस : काळ्या रंगाचा शर्ट घातलेला, केस लांब, वय अंदाजे २५ वर्षे.
मागील सीटवर उजवीकडे : अंगाने मजबूत, डोक्यावर मुस्लीम लोक घालतात तशी टोपी, वय अंदाजे २५ वर्षे.
पोलिसांत तक्रार दाखल…
पवार यांनी जखमी अवस्थेत लोणी काळभोर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार चार अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा बाबर करीत आहेत.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Editer sunil thorat



