अल्पवयीन मुलींचे अपहरण व लैंगिक अत्याचार करणारा आंतरराज्य टोळीचा म्होरक्या जेरबंद…

पुणे : अल्पवयीन मुली व महिलांचे अपहरण करून त्यांना मारहाण, कैद व लैंगिक अत्याचार करणाऱ्या आंतरराज्य गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या बेताब उर्फ शिवम उर्फ शुभम आनंद पवार (रा. हनुमान टेकडी, क्रांतीनगर, कुसगाव, ता. मावळ, जि. पुणे) याला पुणे ग्रामीण पोलिसांनी कर्नाटकातील कलबुर्गी येथून अटक केली. तो महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक राज्यातील पोलिसांच्या रडारवर होता.
प्रकरण काय?
सप्टेंबर २०२३ मध्ये लोणावळा परिसरात अल्पवयीन मुली व महिलांचे अपहरण करून त्यांना कैदेत ठेवून मारहाण, जबरी कामे करून घेणे व लैंगिक अत्याचार केल्याचे गंभीर प्रकार उघड झाले होते. या प्रकरणी त्याचे साथीदार राज शिंदे व ज्ञानेश्वर लोकरे यांना अटक झाली होती, मात्र पवार फरार होता.
पिडीत महिलेला पोलिसांनी सुटका केली तेव्हा तीवर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याचे तसेच तिच्याकडील रोख रक्कम व मोबाईल लुटल्याचे समोर आले. त्याच ठिकाणी आणखी दोन अल्पवयीन मुलेही कैदेत मिळाली होती. त्यांनाही मारहाण करून जबरी कामे करून घेतली जात होती.
आरोपीविरुद्ध गंभीर गुन्हे…
या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात बलात्कार, अपहरण, मारहाण, पोक्सो कायदा, तसेच अल्पवयीन न्याय कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर पुणे ग्रामीणमध्ये ४, गुजरातमध्ये २ व कर्नाटकमध्ये १ असे गुन्हे नोंद आहेत. तो साबरमती कारागृहातून तात्पुरत्या जामिनावर बाहेर आला होता, परंतु परत कारागृहात न हजर होता.
पोलिसांची विशेष मोहीम…
फरार आरोपी कलबुर्गी (कर्नाटक) येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा, लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण पोलीस पथकाने कारवाई केली. मालखेड पोलिसांच्या मदतीने पवारला ताब्यात घेऊन लोणावळा येथे आणण्यात आले. न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
पोलिसांचे मार्गदर्शन…
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, एस.डी.पी.ओ. गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अविनाश शिळीमकर, लोणावळा शहर पो.नि. राजेश रामाघरे, लोणावळा ग्रामीण पो.नि. दिनेश तायडे व त्यांच्या पथकाने केली.
Editer sunil thorat



