
तुळशीराम घुसाळकर
लोणी काळभोर (हवेली) : हवेली तालुक्यातील लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील बाजार मळा परिसरात बिबट्याने गोठ्यात दावणीला बांधलेल्या वासरावर हल्ला करून त्याचा फडशा पाडल्याची धक्कादायक घटना बुधवार (दि. ३१ डिसेंबर) रोजी सकाळी उघडकीस आली. या हल्ल्यात वासराचा जागीच मृत्यू झाल्याने संबंधित शेतकऱ्याचे सुमारे ५९ हजार रुपयांपेक्षा अधिक आर्थिक नुकसान झाले असून परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
अमृत विठ्ठल काळभोर असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. काळभोर हे शेती व्यवसाय करतात. बाजार मळा जिल्हा परिषद शाळेजवळ त्यांचा गायींचा गोठा आहे. मंगळवारी (दि. ३०) रात्री नेहमीप्रमाणे त्यांनी पाच गायी व तीन ते चार महिन्यांचे एक वासरू गोठ्यात दावणीला बांधले होते. रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास सर्व कामे आटोपून ते आपल्या घरी गेले होते.
दरम्यान, मंगळवारी रात्री बिबट्याने सुमारे सहा फुट उंच भिंतीवरून उडी मारून गोठ्यात प्रवेश केला. दावणीला बांधलेल्या वासरावर त्याने अचानक हल्ला केला. मात्र वासराला बांधलेला दोरखंड जाड असल्यामुळे तो तुटला नाही. परिणामी बिबट्याला वासरू उचलून नेणे शक्य झाले नाही. मात्र झालेल्या तीव्र हल्ल्यात वासराचा जागीच मृत्यू झाला.
बुधवारी सकाळी गोठ्यात गेलेल्या अमृत काळभोर यांना सदर प्रकार निदर्शनास आला. घटनेची तीव्रता लक्षात घेऊन त्यांनी तात्काळ लोणी काळभोर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच बीट मार्शल महेंद्र अगळे व तुळशीदास जाधव यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली व या घटनेची माहिती वनविभागाला दिली.
यानंतर लोणी काळभोरचे वनपरिमंडल अधिकारी प्रमोद रासकर, वनरक्षक अंकुश कचरे तसेच वनमजूर तुळशीराम कोंढारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गोठ्यात सिमेंट काँक्रिटचा कोबा असल्यामुळे बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या नाहीत. मात्र गोठ्याला लागून असलेल्या शेतात तीन ते चार फुट उंचीचे गिन्नीगोल गवत मोठ्या प्रमाणात असल्याने याच गवताच्या आडोशातून बिबट्या गोठ्यात शिरला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
या घटनेच्या ठिकाणापासून अवघ्या ३०० फुट अंतरावर दाट लोकवस्ती असून सुमारे १०० घरांमध्ये ४०० नागरिक वास्तव्यास आहेत. बिबट्याचा थेट गोठ्यात शिरून हल्ला केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वी कोरोना काळात रामदरा परिसरातील डोंगर भागात सकाळी व्यायामासाठी जाणाऱ्या अनेक नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाल्याच्या घटनाही घडल्या होत्या, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.
दरम्यान, वनपरिमंडल अधिकारी प्रमोद रासकर यांनी सांगितले की, “सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला असून त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठवण्यात आला आहे. शासकीय नियमानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्याला भरपाई मिळावी यासाठी वनविभागाकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे.” बिबट्याचा वाढता वावर लक्षात घेता परिसरात पिंजरे लावावेत, गोठ्यालगतचे उंच गवत तातडीने काढण्यात यावे तसेच रात्रीच्या वेळी नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
Editer sunil thorat



