पोलिस पाटलांची ऊसतोड करणाऱ्या भावांनी केली तब्बल ५ लाख २२ हजार रुपयांची फसवणूक…
तुळशीराम घुसाळकर
लोणी काळभोर (ता. हवेली) : ऊसतोड मजूर आणून देतो असे सांगून दोन चुलत भावांनी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पोलिस पाटलांची तब्बल ५ लाख २२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
फिर्यादी लक्ष्मण दशरथ काळभोर (वय ५९, रा. तरवडी, लोणी काळभोर) हे स्थानिक पोलिस पाटील असून त्यांचा कृष्णाई गुळ उद्योग समूह नावाने गुऱ्हाळ व्यवसाय सुरू आहे. ऑक्टोबर २०२४ पासून कालुसिंग पावरा हा त्यांच्या गुऱ्हाळावर काम करत होता. एप्रिल २०२५ मध्ये त्याने काळभोर यांना सांगितले की, त्यांच्या मूळ गावी ऊसतोड मजूर आहेत आणि त्याचा चुलत भाऊ भाईदास पावरा हा टोळीचा मुकादम आहे. त्याच्याकडे ४० ते ५० कामगार उपलब्ध असून त्यांना गुऱ्हाळावर आणता येईल, असे सांगण्यात आले.
कामगारांची गरज असल्यामुळे काळभोर यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर कालुसिंग पावरा नंदुरबारला गेला. तेथून त्याने फोन करून आगाऊ रक्कम मागितली. सुरुवातीला काळभोर यांनी फोन पेवरून २० हजार रुपये आणि नंतर २ हजार रुपये त्याला पाठवून दिले.
यानंतर १० मे २०२५ रोजी पुन्हा संपर्क साधून कालुसिंग पावरा याने सांगितले की, “कामगारांची जुळवाजुळव झाली आहे. त्यांना उचलेपोटी रक्कम द्यावी लागेल. त्यासाठी ५ लाख रुपये रोख आणावे लागतील.” कामगार मिळतील या आशेने काळभोर यांनी नंदुरबार येथे जाऊन कालुसिंग याच्याकडे ५ लाख रुपये रोख स्वरूपात दिले. या वेळी त्यांनी रक्कम देतानाचा व्हिडिओ मोबाईलवर शुटिंग करून ठेवला.
रक्कम घेतल्यानंतर कामगार आले नाहीत. दोन दिवसांनी विचारणा केली असता “आम्ही दोन दिवसांत मजूर घेऊन येतो” असे सांगून वेळ काढण्यात आला. मात्र दीर्घकाळ उलटल्यानंतरही कामगार न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच काळभोर यांनी पोलिसांत धाव घेतली.
फिर्यादीवरून कालुसिंग पावरा व भाईदास पावरा (रा. तेलखडे, ता. धडगाव, जि. नंदुरबार) या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश बोराटे करीत आहेत.
Editer sunil thorat



