लिफ्टमध्ये महाविद्यालयीन तरुणीशी छेडछाड ; नागरिकांनी दिला तरुणाला चोप…

तुळशीराम घुसाळकर
लोणी काळभोर (ता. हवेली) : महाविद्यालयीन तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न करत लिफ्टमध्ये छेडछाड करणाऱ्या एका तरुणाला नागरिकांनी चोप दिल्याची धक्कादायक घटना लोणी स्टेशन परिसरात घडली आहे. सदर प्रकार मंगळवार (७ ऑक्टोबर) रोजी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास घडला असून, याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
घटनेचा सविस्तर तपशील…
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी २० वर्षीय तरुणी ही पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. ती आपल्या कुटुंबासोबत हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती परिसरात राहते.
मंगळवारी सायंकाळी ती शिवणकामाचे कपडे घेऊन टेलरकडे जात होती. त्यावेळी लोणी स्टेशन परिसरातील एका इमारतीत लिफ्टमध्ये प्रवेश करताच तिच्यासोबत विशाल लक्ष्मण चाफेकर (वय २४, रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली) हा तरुणही आत आला.
लिफ्टमध्ये असताना चाफेकरने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत “मी तुला चार–पाच वेळा पाहिलं आहे, तुला गोल चष्मा चांगला वाटत नाही, चौकोनी बनव” असे म्हणत ओंगळ वर्तन केले. त्या वेळी तरुणीने शांतपणे दुर्लक्ष केले.
लिफ्टबाहेरही पाठलाग…
लिफ्टमधून बाहेर पडून ती घराच्या दिशेने चालू लागली असता, आरोपी चाफेकर तिच्या मागे आला. हातात असलेल्या दुधाच्या पिशवीने इशारे करत “आता तुझ्याशी बोलायचे आहे” असे म्हणून रस्ता अडवला. अचानक झालेल्या या प्रसंगाने तरुणी घाबरली आणि तिने प्रसंगावधान राखत मोठ्याने आरडाओरडा केला.
नागरिकांचा संताप, आरोपीला चोप…
तरुणीच्या आवाजावर परिसरातील नागरिक धावून आले. त्यांनी आरोपीला पकडून चांगलाच चोप दिला आणि नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर तरुणीने थेट लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेत घटनेची सविस्तर माहिती दिली. फिर्यादीवरून पोलिसांनी विशाल लक्ष्मण चाफेकर याच्याविरुद्ध छेडछाड आणि महिलेला त्रास देण्याचे गुन्हे दाखल केले आहेत.
पुढील तपास सुरु…
या प्रकरणाचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव करत आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून चौकशी सुरु आहे.
स्थानिकांमध्ये संताप…
या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांशी छेडछाड करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
Editer Sunil thorat



