कुंजीरवाडी येथील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई ; लोणी काळभोर पोलीस स्टेशन..

तुळशीराम घुसाळकर / हवेली
पुणे (हवेली) : हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी येथील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. कारवाई झाल्यापासून तो फरार झाला होता. परंतु लोणी काळभोर पोलिसांनी त्याचा शोध घेत आळंदी म्हातोबाची येथील डोंगरमाथ्यावर असलेल्या गवळेश्वर मंदिराच्या परिसरातून शुक्रवार (२४ जानेवारी) रोजी पहाटेच्या सुमारास जेरबंद करण्यात यश मिळविले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम संजय धुमाळ (वय २३ ,रा. धुमाळमळा, कुंजीरवाडी, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शुभम हा लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्यावर खंडणी, जबरी चोरी, दुखापत यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचे वाढते गुन्हेगारी स्वरुप लक्षात घेऊन लोणी काळभोर पोलीसांनी त्याला पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. परंतु, तो तडीपार आदेशाचा भंग करुन वारंवार लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत होता.
यामुळे शुभम धुमाळ याच्यावर कायद्याचा वचक बसावा म्हणून लोणी काळभोर पोलिसांनी महाराष्ट्र झोपडपट्टी, बुटलेगर्स, ड्रग ऑफेन्डर्स आणि डेंजरस पर्सन ऍक्ट अन्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे पाठवला होता. या प्रस्तावाला त्यांनी मान्यता देऊन आरोपी शुभम धुमाळ याच्यावर झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्याप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.
शुभम धुमाळ याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यापासून तो फरार झाला होता. त्याने स्वतः चे अस्तित्व लपवुन तो कोठेतरी लपून बसला होता. त्याने मोबाईलसह व सर्व संपर्काची साधने बंद केल्याने त्याचा ठाव ठिकाणा लागत नव्हता. फरार कालावधीत त्याच्या हातून पुन्हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडण्याची दाट शक्यता होती. याचे गांभीर्य लक्षात घेऊन लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी त्याला पकडण्यासाठी गुन्हे शाखेचे एक शोध पथक तयार केले होते. गुन्हे शाखेचे शोध पथक गेले काही दिवसांपासून शुभम धुमाळ याचा शोध घेत होते. पोलिसांनी अहोरात्र तपास करून त्याचा ठावठिकाणा मिळविला. व धुमाळ याला आळंदी म्हातोबाची (ता.हवेली) येथे डोंगरामध्ये असलेल्या गवळेश्वर मंदिराच्या परिसरातून मोठ्या शिताफीने अटक केली आहे.
लोणी काळभोर पोलीसांनी एमपीडीए. प्रस्तावानुसार नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात आरोपी शुभम धुमाळ याला १ वर्षासाठी स्थानबध्द केले आहे.
सदरची कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलिस हवालदार गणेश सातपुते, विलास शिंदे, संभाजी देवीकर, सुनील नागलोत, बापू वाघमोडे, तेज भोसले, प्रशांत नरसाळे, मल्हारी ढमढेरे, योगिता भोसुरे, बाजीराव विर, शैलेश कुदळे, योगेश पाटील, चक्रधर शिरगिरे, प्रदीप गाडे, राहुल कर्डीले यांनी केली आहे.



