सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धडा : प्रेमसंबंध तुटले म्हणून बलात्काराचा गुन्हा ठरणार नाही…

नवी दिल्ली : परस्पर संमतीने जुळलेल्या प्रेमसंबंधांचा शेवट झाला, म्हणून पुरुषाविरुद्ध दाखल केलेला बलात्काराचा गुन्हा ग्राह्य धरला जाणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (ता. २४) दिला. जस्टिस बी. व्ही. नागरत्ना आणि जस्टिस आर. महादेवन यांच्या खंडपीठाने संबंधित आरोपीविरुद्ध दाखल प्रकरण थेट रद्द करत स्पष्ट निर्देश दिले.
न्यायालयाने नमूद केले की, विवाहाचे खोटे आश्वासन देऊन बलात्कार केल्याचा आरोप सिद्ध करण्यासाठी ठोस, विश्वसनीय आणि प्राथमिक पुरावे आवश्यक आहेत. केवळ नात्यात मतभेद झाले, निराशा निर्माण झाली किंवा संबंध पुढे न वाढल्याने विवाह झाला नाही, म्हणून गुन्हा ठरू शकत नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले.
खंडपीठाने निरीक्षण नोंदवले की…
—सुरुवातीपासूनच आरोपीने खोटे बोलल्याचे पुरावे असणे गरजेचे
—पीडितेची संमती ही फसव्या आश्वासनामुळेच दिली गेली असल्याचे स्पष्ट असणे आवश्यक
—“परस्पर संमतीने झालेले लैंगिक संबंध आणि बलात्कार यामध्ये स्पष्ट व ठोस रेषा आहे,” असे कोर्टाचे निरीक्षण
हायकोर्टाचा निर्णय बाद…
यापूर्वी छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने एका वकिलाविरुद्ध दाखल असलेला गुन्हा रद्द करण्यास नकार दिला होता. विवाहित महिलेशी झालेल्या जवळीक, तीन वर्षांचे नाते, परस्पर संमतीने झालेले संबंध आणि नंतर विवाहाचा नकार यावरून महिला पोलिसांत तक्रार देण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने मात्र केसचा तपशील तपासून हायकोर्टाचा निर्णय रद्द केला.
न्यायालयाने नमूद केले की…
—नातं तीन वर्षे टिकले, तक्रार उशिरा करण्यात आली
—जबरदस्ती, फसवणूक किंवा अचानक त्यागाचे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत
—“फक्त विवाह झाले नाही म्हणून गुन्हा ठरू शकत नाही,” असा स्पष्ट निर्वाळा
या निर्णयामुळे अशा प्रकारच्या प्रकरणांच्या कायदेशीर व्याख्येला नवीन दिशा मिळाल्याचे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.
Editer sunil thorat



