मोदक वजन करून दिल्याचा राग; रेस्टॉरंट मालकाला लोखंडी खुर्चीच्या पायाने मारहाण…

तुळशीराम घुसाळकर
थेऊर (ता. हवेली) ; मोदक वजन करून दिल्याच्या किरकोळ कारणावरून थेऊर येथील चिंतामणी रेस्टॉरंटच्या मालकाला एका टोळक्याने मारहाण केली. लोखंडी खुर्चीच्या पायाने डोक्यात मारून जखमी करण्यात आले असून, जाताजाता “तुला बघून घेतो” अशी धमकीही देण्यात आली. ही घटना थेऊर ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अर्जुन रामेश्वर पाल (वय २७, रा. थेऊर, मूळ गाव – पाहाडपूर, कानपूर, उत्तरप्रदेश) यांनी दिलेल्या तक्रारीवरून साहील (वय अंदाजे १९, रा. थेऊर) व त्याचे ७ ते ८ अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाल हे चिंतामणी रेस्टॉरंट भाडेतत्त्वावर चालवतात. तेथे गणपती उत्सवासाठी मोदक व पेढ्यांची विक्री केली जाते. दरम्यान, सकाळी मोदक वजन करून दिल्याच्या कारणावरून पाल व साहील यांच्यात वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून साहील व त्याचे साथीदारांनी रेस्टॉरंटमध्ये घुसून खुर्च्यांची तोडफोड केली. त्यातील एका खुर्चीचा तुटलेला लोखंडी पाय घेऊन साहीलने पाल यांच्या डोक्यात मारहाण केली. इतरांनी स्टीलच्या भांड्यांनी, हाताने व लाथाबुक्यांनी पाल यांना मारहाण करून धमकी दिली.
या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
Editer sunil thorat



