पूरपरिस्थितीस कारणीभूत ; शिक्षण सम्राटासह सहा जणांवर गुन्हा…

तुळशीराम घुसाळकर
थेऊर (ता. हवेली) : थेऊर परिसरात झालेल्या अतिवृष्टीदरम्यान ओढे, नाले व मोऱ्या बुजवून नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण केल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यात शेतमाल, शेती व पशुधनाचे प्रचंड नुकसान झाले. या प्रकरणी शिक्षण सम्राट प्रसादराव पाटील यांच्यासह सहा जणांविरोधात महसूल विभागाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
ग्राम महसूल अधिकारी अर्जुन नागनाथ स्वामी (रा. वाघोली) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रसादराव दत्ताजीराव पाटील, दिलीप कुंजीर, दत्तात्रय चव्हाण, सुषमा थोरात (सर्व रा. थेऊर) तसेच गोविंद उत्तमचंदानी व राजेश उत्तमचंदानी (रा. लोहगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
तक्रारीनुसार,
गट क्र. ६३ मधील क्षेत्रालगत प्रसादराव पाटील यांनी संरक्षण भिंत बांधल्याने ओढ्याचे पात्र अरुंद झाले.
गट क्र. १६३ व १६४ मध्ये दिलीप कुंजीर, दत्तात्रय चव्हाण व सुषमा थोरात यांनी परवानगीशिवाय ओढा बुजवून अनधिकृत प्लॉटिंग केली.
गट क्र. ६६३ मध्ये गोविंद व राजेश उत्तमचंदानी यांनी जमीन खरेदी करून ओढ्याचे पात्र बुजवून प्लॉटिंग केली.
या अतिक्रमणांमुळे रुकेवस्ती व कांबळेवस्ती परिसरात पुराचे पाणी शिरून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. शेती, शेतमाल व जनावरांचे प्रचंड नुकसान झाले.
अपर तहसिलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या आदेशावरून अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नाळे हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
Editer sunil thorat




