अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती साजरी, नामवंत व्याख्याते ॲड. अविनाश धायगुडे…

संपादक सुनिल थोरात
पुणे (हवेली) : समाजासाठी त्याग आणि समर्पण करणाऱ्या अहिल्याबाई होळकर व त्याचबरोबर सर्व महापुरुषांच्या विचाराची आज समाजाला गरज असून, समाजाने त्यांच्या विचारास अनुरूप आचरण करावे, असे आवाहन नामवंत व्याख्याते ॲड. अविनाश धायगुडे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान, लोणी काळभोर यांच्या वतीने अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी साधना सहकारी बँकेचे माजी चेअरमन बाळासाहेब कोळपे, हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती युगंधर काळभोर, सरपंच भरत काळभोर, माजी सरपंच योगेश काळभोर, सदस्य नागेश काळभोर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदर रुपनर, उपाध्यक्ष संजय विरकर, सचिव आनंदा केसकर, कोषाध्यक्ष हेमंतकुमार कोळपे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ, महिला, धनगर समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना अविनाश धायगुडे म्हणाले की, आज आपण जो पाणी आडवा, पाणी जिरवा प्रकल्प राबवित आहोत ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी ३०० वर्षांपूर्वीच राबविले आहे. थोर व महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करीत असताना त्यांनी केलेले कार्य हे पुढील पिढीसाठी मार्गदर्शक ठरते. पुढच्या पिढीना त्यांनी केलेले कार्य आणि त्याग हे सांगण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करीत असताना त्यांचे कार्य सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रात महान असताना देखील त्यांनी विविध ठिकाणी बांधलेली मंदिरे, नद्यावरील घाट, पिण्याचे पाण्याचे तळी, विहिरी व धर्म निरपेक्ष पद्धतीने केलेली कामे सर्व आदर्श अशी आहे. समाजाने त्यांच्या जयंती निमित्ताने त्यांना अभिवादन करून त्यांचे कार्याचे स्मरण करावे.
अहिल्याबाई या समाजसुधारक व शुरवीर होत्या. त्यांनी धर्मातील रूढी, परंपरां आणि आंधळेपणाने कधीही स्वीकार केला नाही. त्यांनी एकच धर्म पाळला आणि तो म्हणजे मानवताधर्म, एकामागून एक दुः खे येत असतानाही अत्यंत धीराने आपली प्रजा सुखी, समाधानी आणि संपन्न बनवण्यासाठी स्वतः च्या दुःखाचा विचार न करता अहिल्याबाईंनी धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, बंधुता, समता व न्याय या तत्त्वाप्रमाणे राज्य केले. स्त्रियांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेत असताना त्यांना सतीसारख्या प्रथांना अगदी जवळून तोंड द्यावं लागले. अहिल्याबाई यांच्या समान न्यायदानाबद्दल राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देखील प्रभावीत होते. अहिल्याबाई या उत्कृष्ट न्यायदात्या तसेच उत्तम प्रशासक होत्या. त्यांच्या आयुष्यात सामान्य जनतेवर अन्याय होईल असं त्या कधीच वागल्या नाहीत. महान कर्तुत्व नजरेसमोर ठेवून पुरुषांमध्ये जेवढे छत्रपती शिवाजी महाराजांना राज्यकर्ते म्हणून महत्त्वाच स्थान तेवढेच महिलांमध्ये राजमाता अहिल्याबाईंना राज्यकर्ती म्हणून महत्त्वाचे स्थान आहे, असे मत धायगुडे यांनी मांडले.
यावेळी इयत्ता १० व १२ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी काळभोर यांनी केले तर आभार हेमंतकुमार कोळपे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सकल धनगर समाजाचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.



