महिलेला शिवीगाळ करून मारहाण, आरोपी मोकाट; पीडितेचं कुटुंब प्रचंड दहशतीखाली…

पुणे (हडपसर) : पुण्याच्या हांडेवाडीत एका महिलेला काही महिलांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. मारहाण केल्यानंतर पीडित महिलेने पोलिस स्टेशन येथे धाव घेत गुन्हा नोंदवला.
मात्र, पोलिसांत गुन्हा नोंदवल्यानंतरही आरोपी मोकाट आहेत. या प्रकरणावरून आरपीआयच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
पुण्यातील हांडेवाडीत किरण उनवणे या महिलेला दुपारी २ वाजता राणी हांडे, शोभा हांडे, श्रद्धा हांडे, प्राजक्ता गोगावले, राजश्री गाोगावले या महिलांनी जातिवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली होती. या प्रकारानंतर काळेपडळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात येत नव्हता. त्यानंतर आरपीआय पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा शशिकला वाघमारे यांच्याशी न्याय मिळण्यासाठी संपर्क साधला. त्यानंतर आरपीआयच्या पाठपुराव्यामुळे काळेपडळ पोलिसांनी हांडे कुटुंबातील सदस्यांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध गुन्हे दाखल केले. पण अद्यापही आरोपी मोकाट फिरत आहेत.
आरोपींना अटक करण्यास पोलिसांनी टाळाटाळ सुरु आहे, असा आरोप पीडित महिलेने आरपीआयने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला. आरोपी मोकाट फिरत असून पुन्हा दमदाटी करत असल्याने किरण महादेव उनवणे आणि त्यांचे कुटुंब दहशतीच्या वातावरणात जीव मुठीत घेऊन राहत आहे.
शशिकला वाघमारे काय म्हणाल्या…
आरोपी स्थानिक असून आर्थिक परिस्थिती चांगली आहे. आरोपींचे राजकीय लागेबांधे असल्याने अट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल होऊनही तपास अधिकारी वानवडी विभाग सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्याकडून आरोपीना अटक करण्यास विलंब होतो आहे का?
या आरोपींना अॅट्रॉसिटीअंतर्गत अटक होण्यासाठी पोलीस स्टेशनला चकरा मारत आहे. या संदर्भात उपायुक्त डॉ.राजकुमार शिंदे यांनी सांगितले की, पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. तसेच कायद्यातील तरतुदीनुसार या आरोपींना नोटीस पाठवली आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपायुक्त गोडसे यांच्या तपास पथकाकडून सुरु आहे.



