थेऊर येथे लोणी काळभोर पोलिसांची धडक कारवाई : 12 किलो गांजासह एक तस्कर अटक, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त..

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : दौंड तालुक्यातून गांजा घेऊन निगडी येथे विक्रीसाठी नेणाऱ्या रिक्षावर लोणी काळभोर पोलिसांनी थेऊर रेल्वे पूल सेवा रस्त्यावर रविवारी (ता.21) सकाळी सापळा रचून धडक कारवाई केली. या कारवाईत सुमारे 12 किलो 345 ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला असून एका तस्कराला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या तस्कराचे नाव लक्ष्मण राजू पवार (वय 30, रा. यमुनानगर, ओटा स्कीम, निगडी, पुणे) असे असून, त्याच्याविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर रवि आण्णा कुन्हाडे (रा. यमुनानगर, निगडी), चंद्रकांत सुरेश पवार (वय 28, रा. बोरीऐंदी, ता. दौंड, जि. पुणे) व एक अनोळखी इसम यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून ते फरार आहेत.
कारवाई कशी झाली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचनेनुसार अंमली पदार्थ तस्करांवर कारवाई सुरू आहे. त्याअनुषंगाने लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे अंमलदार राहुल कर्डिले यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, थेऊर पुलाजवळून गांजाची तस्करी होणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित रिक्षा पकडला.
झडती घेतल्यावर रिक्षामध्ये सुमारे 2 लाख 50 हजार रुपये किंमतीचा गांजा आढळला. आरोपी लक्ष्मण पवार याला ताब्यात घेतल्यावर त्याने चौकशीत कबुली दिली की, तो गांजा चंद्रकांत पवार व एका अनोळखी इसमाकडून घेऊन विक्रीसाठी नेत होता. मात्र, त्याचा साथीदार रवि कुन्हाडे हा पोलिसांना पाहून रिक्षातून उडी मारून पसार झाला.
या प्रकरणी पोलिसांनी अंमली पदार्थ आणि मानसोपचार विषयक पदार्थ कायदा, 1985 अंतर्गत कलम 8(क), 20(ब)(ii)(अ), 29 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक कामाला लागले आहे.
पोलिसांचे पथकाची कारवाई…
ही कारवाई पुणे शहर पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कामगिरीत सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे, हवालदार गणेश सातपुते, अण्णा माने, रामहरी वणवे, अंमलदार राहुल कर्डिले, प्रवीण धडस, चक्रधर शिरगिरे, सचिन सोनवणे यांचा समावेश होता.
महिला तस्करालाही अटक…
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी लोणी काळभोर परिसरात खुलेआम गांजा विक्री करणारी मंगल संतोष भाले (वय-40, लोणी काळभोर, ता. हवेली) हिला पोलिसांनी अटक केली होती. तिच्याकडून 110 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता. न्यायालयाने तिला 22 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
लोणी काळभोर पोलिसांच्या या सलग धडक कारवायांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Editer sunil thorat



