लोणी काळभोर पोलिसांची मोठी कारवाई : तब्बल १२.५ किलो गांजासह ५ लाखांचा मुद्देमाल जप्त…

लोणी काळभोर (पुणे) : लोणी काळभोर पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईत तब्बल १२ किलो ३४५ ग्रॅम गांजा आणि गांजा वाहून नेणारी रिक्षा असा एकूण ५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एका अज्ञात इसमाचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचनहून निगडीकडे गांजा वाहून नेणारी संशयित रिक्षा असल्याची गुप्त माहिती पोलीस शिपाई राहुल कर्डीले यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने थेउर रेल्वे पुलाजवळ सापळा रचला.
रविवारी सकाळी सुमारे ९.१५ वाजता संशयित रिक्षा दिसताच पोलिसांनी ती थांबवून तपासणी केली. यावेळी रिक्षा चालक लक्ष्मण राजू पवार (वय ३०, रा. यमुनानगर, निगडी) व त्याचा साथीदार रवि अण्णा कुहाडे (रा. यमुनानगर, निगडी) यांच्या ताब्यातून सुमारे २.४० लाख रुपये किंमतीचा १२ किलो ३४५ ग्रॅम गांजा आढळून आला. आरोपी गांजा विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. रिक्षा (क्र. MH-14 LS-3146) देखील जप्त करण्यात आली असून एकूण ५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात आहे.
या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. ४२४/२०२५ नोंदविण्यात आला असून आरोपींवर एन.डी.पी.एस. अॅक्ट ८ (क), २० (ब) (ii) (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. पोलीस उपआयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पो. हवा. माने, सातपुते, वणवे, देविकर, तसेच पोलीस शिपाई राहुल कर्डीले, सोनवणे, दडस, कुंभार, पाटील, कुदळे, विर, गाडे, शिरगीरे यांनी केली.
या कारवाईमुळे लोणी काळभोर परिसरातील अवैध धंदे चालकांना धडा मिळाला असून भविष्यातही अशाच प्रभावी कारवाया सुरू राहतील, असे आश्वासन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिले आहे.
Editer Sunil thorat



