लोणी काळभोर : घरफोडी करून १० लाखांच्या सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी ; पोलिस तपासात गुंतले…

तुळशीराम घुसाळकर
पुणे : हवेली तालुक्यातील थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील बारकेवाडी परिसरात बुधवारी (२४ सप्टेंबर) सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास मोठी चोरीची घटना उघडकीस आली. अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे १० लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या चोरीत रोख रक्कम, सोन्याचे दागिने, चांदीचे पैजण, अंगठ्या, हार, कर्णफुले, झुंबके, कपडे आणि कागदपत्रे असा मुद्देमाल चोरीला गेला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीचा बळी ठरलेले दत्तात्रय पांडुरंग कुंजीर (वय ७१, रा. थेऊर, ता. हवेली) हे त्यांच्या कुटुंबासह बारकेवाडी परिसरात राहतात. मंगळवारी रात्री सुमारे ११ वाजता कुंजीर कुटुंब झोपले होते. पुढच्या सकाळी त्यांनी घराचा दरवाजा आतून उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु बाहेरून कडी लावली असल्याने दरवाजा उघडला नाही. त्यांनी मुलांशी मोबाईलवरून संपर्क साधून कडी उघडण्यास सांगितले.
मुलांनी शेजारील मित्रांच्या मदतीने दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर घराची पाहणी केली असता, एका खोलीचे कुलूप तुटलेले आणि खोलीतील सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळले. घरातील लोखंडी कपाट गायब असल्याचे लक्षात आले. पुढील शोधात हे कपाट घरापासून सुमारे २०० मीटर अंतरावर नर्सरीच्या जवळ सापडले.
कपाटाची पाहणी केली असता त्यातील १ लाख ७५ हजार रुपयांची रोख रक्कम, ५ तोळ्यांची मोहनमाळ, २ तोळ्यांचा लक्ष्मी हार, दीड तोळ्यांच्या दोन अंगठ्या, २ तोळ्याचे कर्णफुले व झुंबके, तसेच चांदीचे पैजण, कपडे, साड्या व कागदपत्रे अशी सुमारे १० लाखांची चोरी झाल्याचे समोर आले.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार, पोलीस हवालदार मल्हारी ढमढेरे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा तयार केला असून, श्वान पथकही तपासासाठी तैनात करण्यात आले आहे.
पोलिसांच्या तपासात समोर आले आहे की, चोरट्यांनी चोरी करताना चारही खोल्यांचे दरवाजे बाहेरून बंद ठेवले होते. एका खोलीचे कुलूप फोडून आत प्रवेश केला गेला. सुमारे शंभर किलो वजनाचे लोखंडी कपाट नर्सरीपर्यंत नेले गेले. तसेच चोरट्यांचे दोन बूट घटनास्थळी पडलेले आहेत, जे त्यांना पकडण्यासाठी महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो.
या घटनेमुळे बारकेवाडी परिसरातील रहिवाशांमध्ये भीती आणि चिंता पसरली आहे. पोलिसांनी नागरिकांना सुचना दिली आहे की, घराची सुरक्षा वाढवावी आणि कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीने पोलिसांना कळवावे.
पोलीस या प्रकरणी तपास सुरु ठेवत आहेत आणि आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेण्यासाठी सर्व शक्यतो प्रयत्न करत आहेत.
Editer sunil thorat



