थेऊरमध्ये प्रेमविवाहाचा वाद चिघळला ; तरुणाच्या वडिलांवर कोयता–गजाने जीवघेणा हल्ला, आठ जणांविरोधात गुन्हा…

तुळशीराम घुसाळकर
लोणी काळभोर (ता. हवेली) : मुलाने प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून मुलींकडील मंडळींनी मिळून तरुणाच्या वडिलांवर कोयता, लोखंडी गज आणि लाकडी दांडक्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना हवेली तालुक्यातील थेऊर येथे घडली. या हल्ल्यात अरुण छबु चव्हाण (वय ४०, रा. चव्हाणवस्ती, थेऊर) गंभीर जखमी झाले असून, लोणी काळभोर पोलिसांनी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी अरुण चव्हाण हे सकाळी दूध आणण्यासाठी जात असताना आरोपी आईनाबाई चव्हाण हिने त्यांच्या मुलगा राहुल आणि तिची नात साक्षी यांच्या प्रेमविवाहावरून शिवीगाळ करत वाद सुरू केला. समजावण्याचा प्रयत्न केला असता तिने कानशिलात मारत आरडाओरडा करत घरातील नातेवाईकांना बोलावून बेकायदेशीर जमाव तयार केला.
यानंतर शेखर चव्हाण याने लोखंडी रॉडने हल्ला चढवला. फिर्यादीने डोक्यावरचा वार हातावर घेतल्याने डावा हात फॅक्चर झाला. राज शितोळे याने ‘आज याला जिवंत सोडत नाही’ असे म्हणत हातातील कोयता डोक्यात मारून गंभीर जखमी केले. दिलीप आणि रोशन चव्हाण यांनी लाकडी दांडक्यांनी तर पुजा चव्हाण, मनिषा शितोळे व उज्वला सावंत यांनी दगडांनी मारहाण केली.
हल्ला थांबवण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या मुलांना अर्जुन आणि पुनम यांनाही शिवीगाळ, धमकी देत लाथाबुक्यांनी मारहाण केली. मारहाणीमुळे अरुण चव्हाण बेशुद्ध पडले. स्थानिकांच्या मदतीने त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर हडपसरमधील खाजगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी राज दादा शितोळे, शेखर चव्हाण, रोशन चव्हाण, दिलीप चव्हाण, आईनाबाई चव्हाण, पुजा चव्हाण, मनिषा शितोळे आणि उज्वला सावंत यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप बिराजदार करत आहेत.
Editer sunil thorat



